तेल, डिझेल, मद्य, डांबराची छुपी खरेदी-विक्री; घटनास्थळी पोलिसांची कारवाई
पालघर: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर असलेल्या एका धाब्यावर इंधनाच्या काळय़ाबाजाराचा प्रकार उघडकीस आला आहे. हा महामार्ग अशा प्रकारांमुळे पुन्हा एकदा प्रकाश झोतात आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन एकाला ताब्यात घेतले आहे.
अलीकडे महामार्ग परिसरात मोठय़ा प्रमाणात धाबे तयार होत असून या धाब्यावर रात्रीच्या वेळी काळे धंदे राजरोसपणे सुरू आहेत, असे सांगितले जाते. धाब्यांवर तेल, डिझेल, इंधन, डांबर, अमली पदार्थ, मद्य, चोरीचे भंगार विक्री असे प्रकार फोफावत आहेत. हे काळे धंदे करणाऱ्याच्या अनेक टोळय़ा महामार्गावर सक्रिय असून अनेक वेळा पोलिसांनी त्यांच्यावर कारवाया केलेल्या आहेत. त्यानंतरही हे प्रकार रात्रीच्या वेळी तेजीत सुरू आहेत.
मनोर महामार्गाच्या नांदगाव हद्दीमध्ये मुंबई वाहिनीच्या एका धाब्यावर बायोडिझेल एका टँकरमधून काढून लहान टेम्पोमध्ये असलेल्या टाकीत बेकायदारीत्या काढले जात होते. हे डिझेल काढताना चक्क यंत्र सामग्रीचा वापर करण्यात आला होता. हा प्रकार एका टोळीद्वारे करण्यात येत होता. काहींना हा प्रकार कळताच याबाबत जाब विचारला असता ही टोळी तेथून फरार झाली.
मनोर पोलिसांना ही माहिती लागताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हा बेकायदा अवैध धंदे करणाऱ्या एकाला तात्काळ ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ५५ लीटर डिझेल व काही साहित्य पोलिसांनी हस्तगत केले आहे. पुढील तपास व चौकशी सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी याविरोधी मोहीम उघडली होती. परंतु ती थंडावल्यानंतर पुन्हा हे प्रकार फोफावले आहेत, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
ढाब्यांवर गैरप्रकार?
बेकायदा भंगार, लोखंडी सळय़ा, प्रतिबंध असलेली मद्य, गुटखा, अमली पदार्थ आदींची जोरदार खरेदी-विक्री सातीवली, हालोली, दुर्वेस, टेन, मस्तान नाका, नांदगाव, आवढानी, चिल्हार आणि वाडा खडकोणा गाव हद्दीतील धाब्यांवर सुरू असल्याचे सांगण्यात येते. रात्रीच्या वेळी काही चालक पार्किंग, जेवणाच्या किंवा आराम करण्याच्या बहाण्याने धाब्यांवर वाहन थांबून हा अवैध व्यवसाय करत असतात. अशा प्रकारे इंधन, जैवइंधनाची तर काही प्रमाणात रसायनांची चोरी करून त्याची काळाबाजारात विक्री केली जाते.