पालघर :  तालुक्यातील बहाडोली येथील दर्जेदार व स्वादिष्ट जांभळाला बाजारात चांगला दर व ख्याती मिळावी, तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी येथील उत्पादक गटांनी विशिष्ट प्लास्टिक डब्यातून जांभूळ बांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे या टपोरी जांभळाला बाजारात वेगळे स्थान निर्माण होईल, असा विश्वास जांभूळ उत्पादक व्यक्त करीत आहेत. उपजिल्हाधिकारी सुरेंद्र नवले यांनी अलीकडे जांभूळ उत्पादकांनी तयार केलेल्या या आकर्षक बांधणीचे उद्घाटन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघरमधील बहाडोली येथील दर्जेदार, स्वादिष्ट जांभळाला बाजारात स्थान निर्माण करण्यासाठी गट तयार करून उत्पादकांनी कंपनी स्थापन करावी, त्यासाठी कोणत्याही बाबीची आवश्यकता भासल्यास त्याची पूर्तता जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येईल, असे नवले यांनी या छोटेखानी कार्यक्रमात सांगितले. बहाडोलीच्या जांभूळ फळांची चव इतरत्र कुठेही उपलब्ध नाही. तसेच त्याचे औषधी उपयोगदेखील आहेत. जांभळापासून इतर प्रक्रियायुक्त पदार्थ बनवून बाजारामध्ये बहडोलीचे वेगळे नाव पटलावर यावे यासाठी जांभूळ फळासही भौगोलिक मानांकन प्राप्त करून घेणे आवश्यक आहे असे मतही नवले यांनी  व्यक्त केले.

शेतकऱ्यांना व त्यांच्या गटाला ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर आधारित स्टॉलसाठी आवश्यक छत्री, क्रेट्स, ट्रे, डिजिटल वजन काटा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे असे जिल्हा कृषी अधीक्षक काशिनाथ तरकसे यांनी माहिती दिली. नाबार्डचे अधिकारी किशोर पडघम यांनी उपस्थित शेतकऱ्यांना जांभूळ पिकाच्या भौगोलिक मानांकनासाठी आवश्यक निधी कृषी विभागामार्फत उपलब्ध करून देण्याचे या वेळी मान्य केले आहे. या वेळी तालुका कृषी अधिकारी तरुण वैती, मंडळ कृषी अधिकारी नरगुलवार आणि शेतकरी गटाचे अध्यक्ष प्रकाश कीणी व सचिव कल्पेश कडू , कृषी पर्यवेक्षक जगदीश पाटील या कार्यक्रमास उपस्थित होते. गावातील जांभूळ उत्पादक शेतकरीदेखील या कार्यक्रमास उपस्थित होते.

तौक्ते चक्रीवादळामुळे बहाडोली येथील जांभळाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे जांभूळ उत्पादकांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यातच गेल्या दोन वर्षांपासून करोनाकाळ असल्याने जांभळाला बाजार उपलब्ध होत नव्हता. परिणामी उत्पादक मेटाकुटीला आला. जांभळाचे नुकसान झाल्यानंतर केंद्रीय समितीने या ठिकाणी भेट देऊन आढावा घेतला होता. वादळाचा फटका बसल्यानंतरही येथील शेतकरी वर्गाने हताश न होता जांभूळ व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी कृषी विभागासह शेतकरी गट पुन्हा एकदा सक्रिय झाला असून या आकर्षक पॅकिंगद्वारे ग्राहकांना आकर्षित करण्याची ही अनोखी कल्पना शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष सत्यात उतरवल्यामुळे जांभूळ पुन्हा एकदा बाजारात तेजी मिळवेल असा उत्पादक यांचा विश्वास आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Good price for quality and delicious purple in the market java plum akp
Show comments