डहाणू : डहाणूतील सरकारी आरोग्य केंद्र, रुग्णालयात वैद्यकीय सुविधा पुरेशा प्रमाणात नाहीत. सरकारकडून या भागातील आरोग्य संस्थांसाठी कोटय़वधींचा निधी पुरवला जातो. मात्र त्यानंतरही येथील आरोग्य व स्थिती दयनीय आहे. अनेक दवाखान्यांच्या इमारती आहेत, मात्र त्यात डॉक्टर, कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे नागरिकांना उपचारांसाठी गुजरात येथे धाव घ्यावी लागत आहे.
डहाणू कॉटेज व उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक औषधांची कमतरता आहे. हीच परिस्थिती कासा उपजिल्हा रुग्णालयात आहे. दारिदय़्र रेषेखालील रुग्णांना मोफत आरोग्य सेवेसाठी आरोग्य कार्डाचे वाटप केले गेलेले आहे, मात्र त्यांनाही अपुऱ्या औषधांमुळे खासगी रुग्णालयांचा आसरा घ्यावा लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्र-गुजरात सीमा भागात राहणारे येथील बहुतेक रुग्ण महाराष्ट्रापेक्षा गुजरात येथे रुग्णालयात उपचारांसाठी धाव घेताना दिसतात. डहाणू उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची एकूण १४ पदे मंजूर आहेत. त्या मंजूर १४ पदांपैकी कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी बालरोगतज्ज्ञ, सर्जन, बधिरीकरणतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ यातील महत्त्वाची अनेक पदे रिक्त असुन या रिक्त पदांमुळे डहाणू उपजिल्हा रुग्णालय सलाईनवर आहे.
अधिकाऱ्यांची एक वर्ष कराराने नेमणूक करून उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार हाकला जात आहे. त्यामुळे संबंधित रुग्णांना शहरातील खासगी रुग्णालयात जावे लागते. बहुतांश दवाखान्यांतील एक्स-रे मशीन धूळ खात पडली आहेत. तज्ज्ञ नसल्यामुळे वैद्यकीय उपकरणे वापरली जात नाहीत. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांना विचारले असता ही रिक्त पदे भरण्याची कार्यवाही आरोग्य संचालनालयाकडून होत असल्याचे सांगण्यात आले.
नियुक्त अधिकारी इतर रुग्णालयीन सेवेत
डहाणू उपजिल्हा येथे सद्य:स्थितीत वैद्यकीय अधिकारी एक पद रिक्त आहे. डहाणू उपजिल्हा रुग्णालय पालघर येथे नेमणुकीस असलेले तीन वैद्यकीय अधिकारी जिल्हा रुग्णालय पालघर, ग्रामीण रुग्णालय पालघर आणि ग्रामीण रुग्णालय मनोर येथे सेवेत आहेत. उपजिल्हा रुग्णालयात नर्सची तीन पदे रिक्त आहेत. सफाई कामगारांची सात पदे रिक्त आहेत. टेक्निशियनची तीन पदे रिक्त आहेत. कनिष्ठ लिपिक दोन पदे तर शिपाई दोन पदे रिक्त आहेत. बालरोगतज्ज्ञ, सर्जन, बधिरीकरणतज्ज्ञ, स्त्रीरोज्ज्ञ वेळेवर उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना गुजरात किंवा सेलवास येथे जावे लागते.