शाळा बंद असल्याने प्रशासनाचा निर्णय

पालघर : डहाणू येथील मध्यवर्ती स्वयंपाकगृहात शालेय विद्यार्थ्यांच्या जेवणाकरिता  उपलब्ध असलेले धान्य डहाणू प्रकल्प अंतर्गत असलेल्या ४५४ कुपोषित बालकांना वितरित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रत्येक कुपोषित बालकाला ३१ धान्य वस्तूंचा संच वितरण करण्यात येत आहे.

डहाणू येथील मध्यवर्ती स्वयंपाकगृहात विद्यार्थ्यांकरिता जेवण तयार करण्यासाठी धान्यसाठा उपलब्ध होता. सद्यस्थितीत शाळा लागलीच सुरू होण्याची चिन्ह नसल्याने तसेच धान्य खराब होईल हे लक्षात घेता सुस्थितीत असलेले धान्य कुपोषित बालकांना वितरित करण्याचा निर्णय डहाणूच्या प्रकल्प अधिकारी आशिमा मित्तल यांनी घेतला आहे. तांदूळ, गहू, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, तेल, मसाले, वेलची असे सुमारे ३१ वस्तूंचा संच तयार करण्यात आला असून डहाणू प्रकल्प अंतर्गत असणाऱ्या कुपोषित बालकांच्या कुटुंबीयांपर्यंत हा संच पोचवण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे आशिमा मित्तल यांनी सांगितले. डहाणू प्रकल्पांतर्गत डहाणू विभागातील २१६, तलासरी विभागातील १०५, कासा विभागातील ४५, मनोर क्षेत्रातील ३४, पालघर क्षेत्रातील ३३ व वसई क्षेत्रातील २१ कुपोषित बालकांना खाद्यपदार्थाचा संच पुरवण्यात येत आहे.

Story img Loader