निखिल मेस्त्री
पालघर : पालघर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या आस्थापना भ्रष्टाचाराचे कुरण व लाचखोरीचा अड्डा बनू लागले आहेत. गेल्या दीड-दोन वर्षांमध्ये जिल्हा परिषदेंतर्गत सुमारे दहा अधिकारी-कर्मचाऱ्यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. लाचखोरीमध्ये अधिकारीवर्ग यांची संख्या जास्त आहे.
पालघर जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार बांधकाम व शिक्षण विभागामध्ये होत आहे. त्या खालोखाल ग्रामपंचायत, पाणीपुरवठा, आरोग्य व इतर विभागांमध्येही असे प्रकार घडत आहेत. प्रामुख्याने ठेकेदाराकडून हे प्रकार घडत असल्याची चर्चा आहे.
जिल्हा परिषदेमध्ये काही विभागांमध्ये बदली प्रक्रिया, याचबरोबरीने मर्जीतल्या ठेकेदाराला कामे मिळवून देणे आदी प्रकारात गैरव्यवहार होत असल्याचे सांगण्यात येते. २०१९च्या दरम्यान शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी यांना लाख रुपयाची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर लगेच काही महिन्यांनी बांधकाम विभागाच्या एक लिपिक जाळय़ात सापडला होता.
दोन दिवसापूर्वी शिक्षणाधिकारी लता सानप यांना २५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. शिक्षण विभागात संचमान्यता, शिक्षक बदली यासह अनेक प्रकरणांमध्ये शिक्षकांकडून व शिक्षण संस्थांचे काम करून देण्याच्या मोबदल्यात पैसे घेण्याचा सपाटाच या शिक्षण अधिकाऱ्यांनी लावला होता अशी चर्चा आहे. जिल्हा परिषदेमध्ये विविध विभागांतर्गत कामे मिळणाऱ्या ठेकेदारांकडून मोठमोठी पाकीटबंद बक्षिसे अधिकारीवर्गासह कर्मचाऱ्यांना वाटली जात आहेत. शासनाचा, आदिवासी विकास विभागाचा निधीत गैरव्यवहार होत असल्याचे सांगितले जाते. असे प्रकार रोखण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले असले तरी अधिकारीवर्ग या प्रयत्नांना हरताळ फासत आहेत. जो कोणी पैसे देईल त्याच्या प्रस्तावाला किंवा प्रकरणाला प्राधान्यक्रम देऊन ते कायद्यात बसवून पूर्ण करून दिले जाते.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाया
• २०१९ : शिक्षणाधिकारी देसले यांनी एक लाख रुपयाची लाच स्वीकारली
• १२ ऑक्टोबर २०२० : बांधकाम विभागाचा कनिष्ठ सहायक प्रकाश पागी ( सहा हजार रुपये)
• २९ ऑक्टोबर २०२१ : जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी संजीव धामणकर (१० दहा हजार रुपये.)
• १६ फेब्रुवारी २०२२ : चिंचणी ग्रामपंचायतीचे सरपंच कल्पेश धोडी ( २० हजार रुपये)
• ११ एप्रिल २०२२ : तारापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शरद गायकवाड (५०० रुपये)
• २५ एप्रिल २०२२ : प्राथमिक शिक्षणाधिकारी लता सानप (२५ हजार रुपये
शिक्षणाधिकाऱ्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
दोन दिवसापूर्वी २५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या शिक्षणाधिकारी लता सानप यांना एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पालघर न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व तपास सुरू आहे.
जिल्हा परिषदेत गैरप्रकार, निधी अपहार अशी अनेक प्रकरणे गाजत असताना अलीकडील काळात लाचखोरीचे अनेक प्रकार उघड झाले आहेत. यामुळे जिल्हा परिषद भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. सत्ताधारी पक्षाच्या काळातच हे सर्व घडत असल्याचे आश्चर्य आहे. – सुरेखा थेतले, विरोधी पक्षनेत्या, जि. प. पालघर
लाच घेणे-देणे व मागणे हा गुन्हा आहे. जिल्ह्यात कोणीही लोकसेवक, लोकप्रतिनिधी लाच मागत असल्यास किंवा भ्रष्टाचार करत असल्यास तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला ०२५२५-२९७२९७ किंवा १०६४ येथे संपर्क करा. – नवनाथ जगताप, उपअधीक्षक, लाचलुचपत विभाग, पालघर पथक
शासकीय सेवेतील अधिकारी-कर्मचारी हे जनसेवेसाठी आहेत. जनतेने नैतिक जबाबदारी म्हणून भ्रष्टाचाराला खतपाणी न घालता त्याची तक्रार करणे आवश्यक आहे. अशा प्रकारांना वेळीच आळा बसावा यासाठी योजना आखली जात असून जिल्हा परिषद प्रयत्न करत आहे. – वैदेही वाढाण, अध्यक्ष, जि. प. पालघर
जिल्हा परिषद भ्रष्टाचाराचे कुरण ; दीड वर्षांत दहा अधिकारी-कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळय़ात
पालघर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या आस्थापना भ्रष्टाचाराचे कुरण व लाचखोरीचा अड्डा बनू लागले आहेत.
Written by निखिल मेस्त्री
First published on: 28-04-2022 at 02:01 IST
Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ground corruption ten officers employees caught bribery prevention department amy