पालघर : पालघर येथील केळवे माहीम येथे स्थित असलेले माहीम मांगेला समाज परिषदेच्या श्री हनुमान मंदिराची स्थापना श्री समर्थ रामदास स्वामींनी १६६२ साली केली होती. ही मूर्ती प्रसिद्ध ११ मारुतींप्रमाणे असून दक्षिणाभिमुख स्थित आहे. आजूबाजूच्या परिसरातील मोठ्या प्रमाणात भाविक येथे दर्शनाला येत असून हे जागृत देवस्थान व नवसाला पावणारा मारुती अशी येथील भाविकांची श्रद्धा आहे.
श्री समर्थ रामदास स्वामींनी श्री राम उपासनेचा संप्रदाय सुरू करून लोकहितार्थ राष्ट्र उत्कर्ष तसेच सामान्य जनास शुद्ध उपासना भक्तीचा मार्ग दाखविण्यासाठी श्री दासबोध, मनाचे श्लोक, आत्माराम हे मुख्य ग्रंथ लिहिले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात निवडक ठिकाणी मारुतीची स्वहस्ते स्थापना केली. याच काळात मौजे केळवे माहीम येथील आताचे श्री हनुमान मंदिर हे देखील बांधले.
माहीम विभागातील गंगाधर रामचंद्र पितळे यांनी माहित असलेल्या माहितीच्या आधारे माहीम गाव व मारुती मंदिराचा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला. श्री समर्थ रामदासांनी ज्या उद्दिष्टांनी या मंदिराची स्थापना केली ते सदैव शाश्वत रहावे, सर्व धर्मीय जातीय बंधू-भगिनींचे धर्मभेद, जातीभेद विसरून मानवतावादी धर्म मंदिरात एकत्रित यावे व ही वास्तू अवैध रहाणे आवश्यक आहे याकरिता परिपूर्णता करण्यासाठी हनुमान मंदिर मंडळाच्या विद्यमाने श्री हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य हाती घेण्यात आले.
मांगेला समाज हा माहीम गावातील मच्छीमारी धंदा करणारा एक समाज आहे. माहीम गावातील मच्छीमारांनी आपल्या वस्तीच्या जवळील या मारुती मंदिराकडे अतिशय लक्ष ठेवले होते. या मारुती मंदिरात पूर्वी सावळ्या नावाचा गुरव होता. त्याचे कुटुंब बरेच वर्षे या मंदिरात सेवा करीत होते. त्यांच्या काळात सन १९३४ ते १९३६ या काळी माहीमच्या मांगेला समाजाने या मारुती मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो तेवढा सफल झाला नाही. त्यानंतर या समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी व गावकऱ्यांनी एकत्र येऊन मिठागर सोसायटीची स्थापना करून मीठ उत्पादनाचा प्रकल्प सुरू केला व श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धाराचे कार्य हाती घेतले.
या मंदिराकरिता मंडळाच्या सदस्यांनी प्रथमतः एक दिवसीय उत्पन्न देण्याचे ठरवले. मात्र ही योजना फायदेशीर नसल्याने प्रत्येक सदस्याने वार्षिक ५० व महिलांनी वार्षिक २४ रुपये जीर्णोद्धार निधी गोळा करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे सहा वर्षाचा निधी गोळा केल्यानंतर मंदिराच्या बांधकामात सुरुवात केली व त्यानंतर अनेक भाविकांकडून मंदिराच्या जीर्णोद्धाला करिता देणगी देण्यात आली. या मंदिराच्या नूतनीकरण बांधकामाचा भूमिपूजन समारंभ २५ ऑक्टोबर १९८४ रोजी बलिप्रतिपदा या मुहूर्तावर पांडुरंग बुधा तांडेल यांच्या हस्ते व तत्कालीन सरपंच रामभाऊ पाटील व तत्कालीन श्री व्यंकटेश मंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त लक्ष्मण लोखंडे यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यानंतर मंदिराचे कलशारोहण मार्च १९८५ साली करण्यात आले. अशाप्रकारे १९७७ मध्ये हाती घेतलेले जीर्णोद्धाराचे कार्य १९८९ मध्ये पूर्ण करण्यात आले. बारा वर्षाच्या तपश्चर्याने मंडळाच्या बंधू भगिनींनी एकजुटीने हे कार्य पूर्ण केले. २४ डिसेंबर १९९१ मध्ये मंदिराच्या वास्तुशांती सोहळा पार पडला.
देवालयाला नवीन रूप दिले आणि देवालयही चमकू लागले. मच्छीमार समाजाचे भजनी मंडळ त्यावेळी प्रसिद्ध होते. त्याकाळी मंदिराची असलेली जबाबदारी गुरव यांच्याकडे होती. मात्र ते कालवश झाल्यानंतर या मंदिराची सर्व जबाबदारी माहीम मच्छीमार समाजावर आली. दरवर्षी हनुमान जयंतीला ही सारी मंडळी एकत्र येऊन अत्यंत थाटात हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करतात. या दिवशी या मंदिरात यात्रेचे स्वरूप येते. यासह पहाटे पाच वाजता कीर्तन त्यानंतर जन्मोत्सव, पूजा व महाप्रसाद असा या दिवसाचा नित्यक्रम असतो. या मंदिराचे पुजारी सूर्यकांत पंडित असून यापूर्वी त्यांचे वडील याच मंदिरात पुजारी म्हणून सेवा करत होते.