डहाणू : डहाणू शहरातील इराणी रोड हा मुख्य रहदारीच्या रस्त्यावर  फेरीवाल्यांनी हातगाडया लावल्याने डहाणूकरांना रस्त्यातून मार्ग काढणे अवघड झाले आहे. मासळी मार्केटकडे जाणाऱ्या या इराणी रोडवर रस्त्यावरच फेरीवाल्यांनी गाडया थाटल्याने पालिकेचा रस्ताच गायब झालेला आहे. भाजी आणि खाद्यपदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांनी थेट  रस्त्यावर अतिक्रमण केल्याने वाहतुकदार आणि रहिवाशांना दररोजच्या भांडणाला तोंड द्यावे लागत आहे.

डहाणू रेल्वे स्थानकातून पश्चिम बाहेर पडल्यानंतर सागरनाका, इराणी रोड आणि रिलायन्स थर्मल पावर रोड असे तीन मुख्य रस्ते जातात. सागर नाकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर तसेच दोन्ही मार्गावर रिक्षांच्या रांगांमुळे रस्ता अरुंद बनलेला आहे. त्यातच वाहनचालक रस्त्यावर वाहने उभी करत असल्याने वाहतूक कोंडी होते. त्यामुळे वाहनांना अडथळा  निर्माण झाला असून दररोजच्या भांडणांनी लोक त्रस्त झाले आहेत. इराणी रोड, थर्मल पावर  रोड, पोलीस ठाण्याच्या आजूबाजूचा परिसर आणि इराणी रोड या भागात भाजी विक्रेत्यांनी जागेअभावी थेट रस्त्यावर उतरून दुकाने थाटल्याने वाहतूक आणि रहदारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. डहाणू नगरपषिदेचे भाजी विक्रेत्यांच्या मनमानी कारभारावर नियंत्रण नाही. त्यामुळे डहाणूकरांना वाढत्या अतिक्रमणाच्या आणि दररोजच्या त्रासाला तोंड द्यावे लागत आहे.

डहाणू नगर परिषदेकडून यावर वेळोवेळी कारवाई करण्यात आली आहे. नियम लावून दिले आहेत.

वैभव आवारे, मुख्याधिकारी, डहाणू नगर परिषद