पालघर : १३०० आजारांवर उपचार करण्यास सर्वसामान्य नागरिकांना लाभदायी ठरणारे महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य कार्ड राज्यातील अनेक नागरिकांकडे असले तरी १९०० आजारांवर विनामूल्य उपचार देणारे आयुष्यमान कार्ड राज्यातील फक्त २७- २८ हजार नागरिकांकडे उपलब्ध आहे. येत्या काही महिन्यात आयुष्यमान कार्ड धारकांची राज्यातील संख्या साडेतीन कोटी पर्यंत नेण्यासाठी मिशन मोडवर काम हाती घेण्यात आले असून त्यामुळे अनेक नागरिकांना विविध आरोग्य विषयी लाभ सहजगत मिळतील असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश अबिटकर यांनी पालघर येथे प्रतिपादन केले. राज्यात येत्या महिन्याभरात १०८ प्रणाली अंतर्गत १७०० सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध होतील अशी ही माहिती त्यांनी दिली.

देशभरात सर्व ठिकाणी उपयुक्त ठरणारे आयुष्यमान कार्ड काढण्यास नागरिकांनी आळस केल्याने अशा कार्डधारकांची संख्या राज्यात २८ लाखांपेक्षा कमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवसांमध्ये राबविण्याच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमात आयुष्यमान कार्डधारकांची संख्या साडेतीन कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले असून आरोग्य यंत्रणा तसेच इतर विभागाच मदतीने हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मिशन मोडवर काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

सन २०१४ मध्ये राज्य सरकारने करारनामा करून १०८ प्रणालीच्या रुग्णवाहिका सेवा सुरू केली. या कराराला १० वर्षांचा कालावधी उलटला असून रुग्णवाहिकांची स्थिती खालावली असून त्यामुळे सेवेच्या दर्जावर परिणाम झाल्याचे आरोग्यमंत्री यांनी सांगितले. जून २०२३ मध्ये राज्य सरकार बरोबर करण्यात आलेल्या नवीन करारनामा मध्ये सध्या असलेल्या ९५७ रुग्णवाहिकांऐवजी १७०० सुसज्ज रुग्णवाहिका घेण्याची तरतूद करण्यात आली असून निवडणुकीदरम्यान असणारी आचारसंहिता व इतर तांत्रिक कारणांमुळे हा प्रस्ताव रखडला होता.

सुमारे ६०० कोटी रुपयांच्या या प्रस्ताव करारनामा करण्याच्या अंतिम टप्प्यात असून एका महिन्याभराच्या कालावधीत हृदयरोग संदर्भातील रुग्णांना देखील हाताळू शकणाऱ्या आयसीयू रुग्णवाहिका १०८ प्रणालीच्या ताफ्यात दाखल होतील असे प्रकाश अबिटकर यांनी पत्रकारांना माहिती दिली. विविध आरोग्य संस्थांमध्ये असणाऱ्या १०२ प्रणालीच्या रुग्णवाहिका रुग्णालयात दाखल रुग्णांच्या वाहतुकीसोबत अपघात व इतर गंभीर रुग्णांना संदर्भीय सेवा देण्यासाठी वापरात आणाव्या अशा सूचना त्यांनी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.

करोना काळात अनेक ठिकाणी प्राणवायू निर्मिती करणारे प्रकल्प उभारण्यात आले तसेच मोठ्या प्रमाणात प्राणवायूच्या सिलेंडरची खरेदी करण्यात आली होती. सध्या हे प्रकल्प वापरत नसून अशा प्रकल्पांचा सार्वजनिक उपयोग करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभाग विचार करत असल्याचे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

आरोग्य विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना उत्तेजनार्थ प्रोत्साहन भत्ता देण्याचे निश्चित झाले असताना कामचुकारपणा करणे, वेळ मारून नेण्याची प्रवृत्ती जोपासण्याची प्रवृत्ती असणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असा संकेत दिले. राज्यभरात संदर्भीय सेवा देताना गर्भवती महिलांना १०८ प्रणाली मधून इतर रुग्णालयात स्थलांतर करताना धावत्या रुग्णवाहिकेत झालेल्या प्रसूतींच्या प्रकारांची दखल घेऊन त्या सदर्भात राज्यभरात लेखापरीक्षण करणे व संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागविण्याचे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचित केले. या प्रकरणात दोषी आढळल्यास संबंधिताविरुद्ध कारवाई करण्यात येईल असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

पालघरची आरोग्य व्यवस्था सहा महिन्यात सुधारणा

पालघर जिल्हा निर्मितीला १० वर्षांचा कालावधी उलटला असला तरी या ठिकाणची आरोग्य व्यवस्था सक्षम नसल्याने आरोग्य मंत्री यांनी चिंता व्यक्त केली. सन २०१९ मध्ये बांधकाम सुरू केलेले मनोर येथील ट्रॉमा सेंटर येत्या सहा महिन्यात कार्यरत करण्यासाठी व जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करणार असल्याचे सांगितले. या ट्रॉमा केअर सेंटरसाठी निधीची उपलब्धता, पद मान्यता व कर्मचारी अधिकाऱ्यांची उपलब्धता करून देणार असून त्या दृष्टीने कालबद्ध कार्यक्रम हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे पालघर येथील सामान्य रुग्णालय उभारणीचे काम समाधानकारकरित्या सुरू असले तरीही उपलब्ध झालेल्या वास्तूचा आरोग्य सेवेसाठी लवकरात लवकर वापरत आणून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील राहील असे सांगण्यात आले. या रुग्णालयाच्या कामासाठी तसेच रुग्ण खाटांची संख्या वाढवण्यासाठी आवश्यक ७५- ८० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येईल असे ते म्हणाले. पालघर जिल्ह्याला पुढील सहा महिन्यात चांगल्या प्रकारच्या आरोग्य सुविधा मिळतील असे आश्वासित करताना या दोन्ही प्रमुख रुग्णालय तसेच आरोग्याशी संबंधित इतर समस्या सोडवण्यासाठी मंत्रालयात तात्काळ विविध विभागांची संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात येईल असेही आरोग्य मंत्री यांनी स्पष्ट केले.

वस्तुस्थिती पाहण्यासाठी दौरा

पालघर जिल्ह्यातील आरोग्य समस्या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी अनेकदा विधिमंडळात प्रश्न उपस्थित केले. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात निधी देऊन देखील आरोग्याच्या समस्या सुटत का नाहीत हे पाहण्यासाठी आपण प्रत्यक्ष दौरा करण्याची आखले असल्याचे प्रकाश अबिटकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. पालघरच्या सामान्य रुग्णालयाच्या बांधकामाचा दर्जा समाधानकारक असल्याचे सांगताना मनोर येथील ट्रॉमा केअर सेंटर चे बांधकाम समाधानकारक नसल्याचे त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून निदर्शनास आणून दिले.

स्थानिक पातळीवरील प्रश्नांचे महत्त्व आपल्याला समजले असून अपूर्ण काम पूर्ण व्हावीत व उभारलेल्या आस्थापना उपयुक्त ठराव्यात यासाठी नियोजन करणार असल्याचे प्रतिपादन केले. पालघर मध्ये इतक्या क्षमतेच्या रुग्णालयांची आवश्यकता आहे का या संदर्भात पत्रकार व पक्षीय कार्यकर्त्यांकडून माहिती घेतली. तसेच पालघर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्या संदर्भात सद्यस्थिती जाणून घेतली. पालघर जिल्ह्याच्या शहरी भागासह जव्हार भागात देखील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे असे पत्रकारांतर्फे सुचवण्यात आले.

Story img Loader