लोकसत्ता वार्ताहर
कासा : मार्च महिन्यापासून उन्हाचा पारा वाढल्यामुळे पालघर जिल्ह्यात उष्माघाताचे रुग्ण वाढण्यास सुरवात झाल्याने जिल्ह्याच्या विविध भागांमधील रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरु करण्यात आले आहेत. या कक्षांमध्ये उष्माघाताचे रुग्ण दाखल करून त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
पालघर जिल्ह्यात एकूण १२ उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आले असून यामध्ये जव्हार, कासा, डहाणू या तीन उपजिल्हा रुग्णालयात तर उर्वरित नऊ मोखाडा, वाडा, विक्रमगड, मनोर, पालघर, बोईसर, वाणगाव, तलासरी, विरार येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये स्थापन करण्यात आले आहेत. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्या पासून सुरु करण्यात आलेल्या उष्माघात कक्षामध्ये दररोज उपजिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालयात किमान चार ते १० रुग्ण दाखल होत आहेत. मात्र यामध्ये एकही गंभीर रुग्ण नसल्याची माहिती पालघर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामदास मराड यांनी दिली.
कडाक्याच्या उन्हात काम केल्याने किंवा शरीरात उष्णता निर्माण झाल्याने गंभीर त्रास होतो, त्याला उष्माघात म्हणजे सनस्ट्रोक असे म्हटले जाते. ही एक जीवघेणी अवस्था असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे असून यापासून वाचण्यासाठी जलसंजीवनी (ओआरएस) तसेच लिंबू पाणी, पिण्याचे पाणी वारंवार प्यावे, उन्हात जास्त थांबू नये. नारळपाणी, कलिंगड, खरबूज, काकडी अशी भरपूर प्रमाणात पाणी असलेली फळे खावीत. रुग्णांना जास्त त्रास होत असल्यास जवळच्या ग्रामीण किंवा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणे आवश्यक असल्याचेही डॉ. रामदास मराड यांनी सांगितले.
जिल्हा परिषद शाळांच्या परीक्षा २८ एप्रिल पर्यंत असल्याकारणाने विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात शाळा गाठावी लागत आहे. म्हणूनच शालेय विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या आवारात मुबलक प्रमाणात स्वच्छ पिण्याचे पाणी, पंखे, प्रथमोपचाराची सुविधा शाळा व्यतवस्थापनाने उपलब्ध करुन देणे गरजेचे झाले आहे. लहान मुल पाणी पिण्यासाठी टाळाटाळ करतात यासाठी त्यांना उष्माघातातुन बचावासाठी पाण्याचे महत्व सांगून सतत पाणी पिण्यास सांगावे.
जव्हार मोखाडा या तालुक्यांमधल्या बहुतांश भागात पाणीटंचाई निर्माण झाली असल्याकारणाने पाण्यासाठी अनेक महिलांना उन्हातानात पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत बाहेर पडताना आपल्या सोबत लिंबू पाणी किंवा ओआरएस सोबत न्यावे तसेच सुती कापड सोबत असेल तर गरज भासल्यास ते ओले करून डोके कडक उन्हापासून सुरक्षित ठेवण्यासाठी सहाय्य होईल.
उष्माघात कक्षात उपलब्ध असणाऱ्या सुविधा
उष्माघाताचे रुग्ण दाखल करण्यात येणारा कक्ष सर्व सोयीने युक्त असतो. यामध्ये परिस्तितीनुसार बेड उपलब्ध असतात. हवेशीर खिडक्या, एअर कंडिशनर, पंखा, रुग्णांसाठी तातडीचे आय व्ही सेट, आय व्ही स्टॅन्ड, ओआरएसची पाकीटे असतात. तसेच रुग्णलायात जनरेटर उपलब्ध असल्याने वीज पुरवठा खंडित झाला तरीदेखील तात्काळ जनरेटर सुरु करण्यात येत असल्याने वीज गेल्याचा परिणाम रुग्णांच्या आरोग्यावर होत नाही.