नीरज राऊत/सचिन पाटील

पालघर: पालघर जिल्ह्यात किनारपट्टीच्या तालुक्यांमध्ये पहाटेपासून जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतकरी, गवत पावळी चे व्यापारी आणि विट उत्पादक चिंताग्रस्त झाले असून ग्रामीण भागात काही प्रमाणात नुकसान झाले.

भारतीय हवामान विभागाने २६ आणि २७ नोव्हेंबर असे दोन दिवस पालघर जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला आहे. रविवारी पहाटे पासून विजेच्या गडगडाटासह जिल्ह्यातील मनोर, बोईसर, वाणगाव, डहाणू, कासा, बोर्डी परीसरात रिमझिम पावसाचा शिडकावा झाला.

आणखी वाचा-शहरबात : संपर्क यात्रा प्रचारात निष्प्रभ

ढगाळ वातावरणासोबत सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी, गवत पावळीचे व्यापारी आणि वीट उत्पादक धास्तावले आहेत. या पावसाचा बागायती आणि आंब्याच्या मोहोरावर देखील विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात अनेक शेतकऱ्यांची भाताची झोडणी अजून बाकी आहे. पहाटे आलेल्या अचानक आलेल्या पावसाने शेताच्या खळ्यावर रचून ठेवलेली भाताची उडवी भिजली असून त्यावर आच्छादन टाकण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली. गवत पावळी खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी गावोगावी वखारी सुरू केल्या असून पावसाने त्यांचे देखील नुकसान झाले. काही वीट उत्पादकांनी नुकतेच कच्च्या विटा बनविण्यास सुरवात केली असून त्यांना देखील या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

आणखी वाचा-केळवे बीच पर्यटन महोत्सवाला पर्यटकांची गर्दी

पालघर जिल्ह्यात रविवार प्रमाणेच सोमवारी देखील मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागा तर्फे वर्तविण्यात आली आहे.

लग्नसराई आयोजक धास्तावले

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आज अनेक ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात येत असून तुळशीचे लग्नाचे आयोजन करण्यात येत आहे. उद्या सोमवारी अनेक ठिकाणी लग्न मुहूर्त असून हळदीचे कार्यक्रम तसेच लग्नाच्या आयोजनावर पावसाचे सावट पसरल्याने आयोजकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Story img Loader