किनारपट्टी परिसरांत पावसाचा जोर, ग्रामीण भागांत प्रमाण कमी; जिल्हा प्रशासन सतर्क, यंत्रणा सज्ज

पालघर : पालघर जिल्ह्यत पावसाला दमदार सुरुवात झाली असून पालघर, डहाणू तालुक्यांतील किनारपट्टी  परिसरांत पावसाचा जोर कायम आहे. तर पूर्व पट्टय़ातील ग्रामीण भागांमध्ये पाऊस कमी प्रमाणात होता. हवामान खात्याने पुढील काही दिवस दिलेल्या पावसाच्या इशाऱ्यानुसार व सूचनेनुसार जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत तालुक्यांमध्ये प्रतिबंधात्मक तयारी  करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर जिल्ह्यत पालघर, डहाणू, तलासरी या तालुक्यांत दिवसभर जोरदार पाऊस होता, तर मोखाडा, जव्हार, वाडा, विक्रमगड भागांत सकाळच्या सत्रात पाऊस पडला. दुपारनंतर पावसाच्या सरी कमी झाल्या. समुद्राला भरती येण्याची शक्यता असल्याने खबरदारीच्या उपाययोजना आखण्यात आल्या होत्या. दिवसभर अधूनमधून पाऊस सुरू  राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले. काही सखल भागांत पाणी साचले. असे असले तरी पश्चिम रेल्वेसेवांवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले. हवामान खात्याने शनिवापर्यंत  सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यानुसार  प्रशासनाने पूर्वतयारी करून ठेवावी, असे शासनामार्फत सांगितले गेले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी जिल्ह्यतील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याशी आभासी बैठकीतून सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या. किनारपट्टी भागातील तसेच इतर ठिकाणी पावसापासून धोका असलेल्या गावातील नागरिकांच्या स्थलांतरासाठी शाळा, महाविद्यालये, समाजमंदिर, सभागृहे राखून ठेवण्यात आली असून आवश्यक असल्यास त्या ठिकाणी नागरिकांना सुरक्षित ठेवता येणार आहे, असे प्रयोजन आहे.

पालघर- बोईसर पर्यायी रस्ता वाहून गेला

पालघर: पालघर-बोईसर रस्त्यावर नवीन जिल्हा कार्यालय संकुलासमोर पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून या मार्गावर तयार केलेला पर्यायी मार्ग मुसळधार पावसात  वाहून गेला आहे. यापूर्वी १७ व १८ मे रोजी चक्रीवादळाच्या दरम्यान झालेल्या पावसात देखील या रस्त्याची हीच गत झाली होती. पालघर – बोईसर प्रवास करणाऱ्या नागरिकांना नंडोरेमार्गे तसेच दापोली- उमरोळीमार्गे पर्यायी मार्गाने प्रवास करणे भाग पडत आहे.

पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

अतिवृष्टी दरम्यान दुधाळ व पाळीव जनावरे यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता लक्षात घेता पशुसंवर्धन उपायुक्त यांनी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्ह्यतील पशुधन अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी यांना दिल्या आहेत. यासाठी तालुकास्तरावर पंचायत समिती अंतर्गत समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्या जिल्ह्यतील पशुवर नियंत्रण ठेवून योग्य ती माहिती जिल्ह्यला पुरवणार आहेत. आपत्ती उद्भवल्यास पशुसंवर्धन उपायुक्त प्रशांत कांबळे ९६७७४०६६४ या क्रमांकावर किंवा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अजित हिरवे यांना नऊ २२६३३२८५० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे

पेरणींच्या कामांना वेग येणार

पहिल्या पावसामुळे शेतकरी सुखावला असून जिल्ह्यतील पेरणीच्या कामांना वेग येणार आहे. ८० टक्के ओलावा असेल तरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, अशा सूचना कृषी विभागामार्फत करण्यात आल्या आहेत. तर पालघर जिल्ह्यत पुढील तीन दिवसांत मुळसधार पावसाची शक्यता लक्षात घेता दहा जवानांचा समावेश असलेली  राष्ट्रीय आपत्ती निवारण  पथकाच्या  (एनडीआरएफ)  तुकडीची मागणी जिल्हाधिकारी यांनी केली आहे.

पावसामुळे पालघर तालुक्यातील दापोली येथील खारटण जमीन पाण्याखाली गेल्याने त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.