मनोर वाडा भिवंडी राज्य मार्गावर मनोर (टेन) जवळ असणाऱ्या पुलाला भगदाळ पडल्याची तक्रार प्राप्त झाल्याने या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. या पुलाची उद्या सकाळी तज्ञांमार्फत तपासणी करून नंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्या वर्ष दीड वर्षापासून राज्यमार्ग ३४ वरील टेन गावाजवळील देहेर्जा नदीवरील पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. तसेच या पुलावरून अवजड वाहतूक होताना विशिष्ट कंपास जाणवत होता. या पूर्वाच्या दुरुस्ती कडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले होते. या पुलाला भगदाड पडल्याचे तसेच हा पूल वाहतुकीस धोकादायक झाल्याची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आज रात्री आठ वाजल्याच्या सुमारास प्राप्त झाली.

हेही वाचा >>> भाजपाचे घूमजाव, गावित यांच्या उमेदवारीला विरोध नसल्याचे स्पष्ट

या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ दाखल होऊन पाहणी केली असता प्रथमदर्शनी पुलामध्ये कोणत्याही प्रकारचे भगदाड अथवा तडा गेल्याचे निदर्शनास आले नाही. यापुलाची तज्ज्ञां मार्फत उद्या (सोमवार) सकाळी तपासणी करण्यात येणार असून दरम्यानच्या काळात या मार्गावरील अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. त्याचबरोबर विक्रमगड फाटा येथे पुलाचे काम सुरू झाल्याने त्या परिसरात देखील वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. टेन जवळील पुलावरून अवजड वाहतूक बंद केल्याने या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांच्या रांगा लागल्या असून ही वाहतूक शिरसाट फाटा व चिंचोटी मार्गे भिवंडी जाण्यास वळण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.