लोकसत्ता वार्ताहर

कासा : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील महालक्ष्मी उड्डाणपुलावर आज सकाळी साडेआठच्या सुमारास एका दुचाकीस्वार पोलीस कर्मचार्‍याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. मात्र त्यांनी हेल्मेट परिधान केल्याने त्यांचे प्राण बचावले. या अपघातात जखमी झालेले पोलीस कर्मचारी मधुकर गोदाळे (रा. तलासरी, कुर्झे) हे सध्या चारोटी येथील पोलीस महामार्ग कक्षात कार्यरत आहेत.

मधुकर गोदाळे हे ड्युटी संपवून सकाळी आपल्या दुचाकीवरून तलासरीतील कुर्झे गावाकडे जात होते. दरम्यान, महालक्ष्मी उड्डाणपुलावर एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर गोदाळे यांच्या दुचाकीचा ताबा सुटून ते रस्त्यावर जोरात आदळले. या अपघातात त्यांच्या शरीराच्या इतर भागांना दुखापत झाली. मात्र हेल्मेट असल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली नाही.

घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने मदतीचा हात पुढे करत जखमी श्री. गोदाळे यांना कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना तत्काळ डहाणू येथील कॉटेज हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले असून, तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघातामुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली असून, महामार्गावरील वाढती अपघातांची संख्या पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील महालक्ष्मी उड्डाण पुलाजवळ अलीकडच्या काळात अपघातांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. महामार्गावर काँक्रीटीकरण करताना ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून योग्य नियोजन करण्यात आले नसल्यामुळे आणि अतीवेगात आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या दोन वर्षात महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात पाहायला मिळाले. पालघर मधील मेंढवन ते आच्छाड दरम्यान ५१ किलोमीटर पट्ट्यात मार्च २०२४ ते आजतागायत वर्षभरात १०५ अपघात झाले असून यामधील ७७ अपघात गंभीर स्वरूपाचे आहेत. यामध्ये एकूण ५७ जणांचा मृत्यू झाला असून ३५ गंभीर तर ४४ जण किरकोळ जखमी झाले आहेत.

मेंढवन ते आच्छाड दरम्यान मेंढवन, चारोटी, विवळवेढे (महालक्ष्मी), धानीवरी, आंबोली, दापचरी, तलासरी, सूत्रकार आणि आच्छाड हे अपघात प्रवण क्षेत्र सिद्ध झाले आहेत. या अपघात प्रवण क्षेत्रात सर्वात जास्त २६ अपघात हे मेंढवन हद्दीत झाले असून आंबोली येथे १७ आणि विवळवेढे (महालक्ष्मी) हद्दीत १२ अपघात झाले आहेत.

महामार्गावर पोलीस कर्मचारी देखील सुरक्षित नसल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण, वाहतूक विभाग आणि पोलीस प्रशासनाने आता कठोर पावले उचलण्याची गरज आहे. वाहने नियंत्रित करण्यासाठी सीसीटीव्हीची संख्या वाढविणे, स्पीड रडार यंत्रणा कार्यान्वित करणे आणि नियमित गस्त वाढविणे ही आवश्यक पावले तातडीने उचलण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून आणि पोलीस दलातून होत आहे.

दरम्यान, अपघातग्रस्त वाहन आणि अज्ञात वाहनचालकाचा शोध घेण्याचे काम सुरू असून, कासा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून पुढील तपास सुरू आहे.या महामार्गावर प्रवास करणारे बहुतांश दुचाकीस्वार हेल्मेट चा वापर करत नसल्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे व गंभीर स्वरूपाची डोक्याला दुखापत होऊन अनेकांचे प्राण देखील गेले आहेत. वारंवार वाहतूक पोलीस तसेच पोलीस प्रशासन नागरिकांना हेल्मेट वापराबाबत सूचना करून देखील नागरिक याकडे डोळे झाक करताना दिसून येत आहेत.