प्रादुर्भावामुळे शेतकरी हवालदिल: कृषी विभागाकडून पंचनामे करण्याची मागणी

डहाणू/वाडा: मागील दोन आठवडय़ांतील अनियमित पावसामुळे बगळ्या रोगाचा प्रादुर्भाव  वाढला असून करोनाकाळामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी चिंतेत सापडला आहे. पालघर जिल्ह्य़ातील पालघर, डहाणू, वाडा, विक्रमगड, तलासरी तालुक्यांतील शेतकऱ्यांचे भातपीक हेच उत्पनाचे साधन असून बगळ्या रोगामुळे शेती संकटात सापडली आहे. परिणामी, नुकसान झालेल्या शेतीचे पुन्हा नव्याने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे. डहाणू तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना पाने गुंडाळणाऱ्या अळीचा (बगळ्या बग्ग्या) व्यवस्थापन करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आल्याचे तालुका कृषी अधिकारी संतोष पवार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

डहाणू तालुक्यात भातपिकाखालील क्षेत्र १५४९२.६० हेक्टर असून खरीप हंगाम २०२१ मध्ये डहाणू तालुक्यात नुकतीच भाताची लागवड पूर्ण झाली आहे. यामध्ये हळव्या, निमगरव्या व गरव्या भाताच्या लागवडीचा समावेश आहे. सुरुवातीच्या चांगल्या पावसामुळे उत्साहाने व वेळेत शेतकऱ्यांनी भात लागवड पूर्ण केली. त्यामुळे काही ठिकाणी हळवे भात पोटरीच्या अवस्थेत आले आहे, परंतु बगळ्या रोगाने आक्रमण केल्याने हातातोंडाशी येणारे पीक जाण्याची भीती शेतकऱ्यांत पसरली आहे.

पावसाच्या अनियमित पणामुळे वातावरणात उष्णतेचे प्रमाण अधिक वाढले आहे व त्याचा परिणाम भातपिकांवर होत असून या कोंदट, उष्ण वातावरणामुळे आलेल्या टवदार भातपिकावर पाने गुंडाळणारी अळी (बगळ्या रोगाचा) प्रादुर्भाव झाला असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. विक्रमगड तालुक्यातील सारशी, आंबेघर, धरमपूर, केगवा, खडकी, सातखोर या गावांतील भातशेती या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तर वाडा तालुक्यातील कशिवली, कुंभिस्ते, मुरबीचा पाडा या ठिकाणच्या शेत जमिनीतील भातपिकावर हा कीडरोग दिसून येत आहे. इतर गावांत या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कृषी विभागाकडून योग्य खबरदारी घ्यावी, अशी मागणी अन्य गावांतील शेतकऱ्यांनी केली आहे.

  • लक्षणे:

पाने गुंडाळणारी अळी पानांच्या

दोन्ही कडा एकत्र चिकटवून

पानाची गुंडाळी करते. आतील पृष्ठभागातील हरितद्रव्य खाते.

त्यामुळे गुंडाळीच्या पृष्ठभागावर

पांढरट चट्टा पडतो. जास्त नुकसान असेल तर पीक निस्तेज पडते. अशाप्रकारे शेतात उभ्या भातपिकाचे नुकसान या किडीमार्फत होते.

  • व्यवस्थापन :

बांधावरील गवत काढून बांध स्वच्छ ठेवावेत. निसर्गत: भातपिकामध्ये परभक्षक असतात त्यांचे संवर्धन व संरक्षण करावे. कीडग्रस्त पिकावर एक दोर आडवा ओढत न्यावा म्हणजे पानाच्या गुंडाळीतील अळ्या पाण्यात पडतील. दोर ओढण्यापूर्वी शेतात पाणी साठवून ठेवावे आणि दोर ओढल्यानंतर पाणी तात्काळ शेताबाहेर काढावे.

  • उपाय:

मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के प्रवाही ७०० मि.लि. प्रति ५०० लिटर पाण्यात किंवा फेन्रिटोथिऑन ५० टक्के प्रवाही ५०० मि.लि. प्रति ५०० लिटर पाण्यात किंवा कार्बारील ५० टक्के पाण्यात विरघळणारी पावडर १ कि.ग्रॅ. प्रति ५०० लिटर पाण्यात यापैकी कोणतेही एक कीटकनाशक एक हेक्टरसाठी फवारावे.

मागील दोन आठवडय़ांतील अनियमित पावसामुळे बगळ्या रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. खरीप हंगाम- २०२१ क्रॉपसॅपअंतर्गत भातपिकावरील किडी/रोगाबाबत सल्ला देण्यात आला आहे. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये तसेच कृषी साहाय्यकांच्या मदतीने   बगळ्या रोगाची मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी त्याचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

– संतोष पवार, तालुका कृषी अधिकारी, डहाणू, जि. पालघर