वाडा : होळीचा सण अजून चार दिवसांवर आला असला तरी आत्तापासूनच शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्ये उत्साह दिसू लागला आहे. रंग, पिचकाऱ्या, साखरगाठय़ांनी बाजारपेठा सजल्या आहेत. पालघर, बोईसर बाजारपेठांबरोबर आदिवासीबहुल वस्ती असलेल्या डहाणू, तलासरी, कासा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा येथील बाजारपेठांत गर्दी वाढू लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोजगारासाठी शहरी भागात गेलेले आदिवासी बांधव होळीच्या सणासाठी  गावाकडे परतत आहेत.  मूळ गावी येण्यापूर्वी ते तालुका मुख्यालयी असलेल्या बाजारपेठेत हजेरी लावताना दिसत आहेत. धुळवडीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पिचकाऱ्या, रंग, फुगे अशा विविध वस्तूंची विक्री करण्यासाठी  बाजारपेठाही सजल्या आहेत. पिचकाऱ्यांमध्ये  छोटी बंदूक, प्रेशर गण, पाठीवरील गण अशा प्रकारच्या पिचकाऱ्या दिसत आहेत. आयुर्वेदिक, सुगंधी रंगाचे प्रमाण अधिक दिसत आहेत. वनस्पतींपासून बनविलेले आयुर्वेदिक रंगांना, पावडरला  ग्राहकांची अधिक पसंती  आहे.

विशेषत: झेंडूची फुले, कागदी वृक्षांची फुले, काही वनस्पतींची पाने यांपासून बनविलेल्या रंगाची किंमत जास्त असली तरी त्याची मागणी अधिक आहे. होळीच्या निमित्ताने घरोघरी होणाऱ्या पोळय़ा बनविण्यासाठी लागणारे मैदा, गूळ या सामानाची खरेदी करणाऱ्या ग्राहकांची गर्दी किराणा दुकानांमध्ये दिसून येत आहे. त्याचबरोबर काही भाविकांकडून होळीसाठी श्रीफळ, साखरगाठी खरेदीही सुरू झाली आहे.  वस्तूंच्या किमती २५ ते ३० टक्के वाढलेल्या आहेत. तरी भारतीय बनावटीच्या वस्तूंचीच ग्राहकांकडून खरेदी केली जात असल्याचे किरण आंबवणे या विक्रेत्याने सांगितले.

चिनी बनावटीच्या वस्तू हद्दपार

भारतीय विविध सण, उत्सवांमध्ये बाजारपेठेत आवर्जून विक्रीस असलेल्या चायना बनावटीच्या वस्तू सध्या हद्दपार झाल्याचे दिसून येत आहे. या वर्षी होळीच्या बाजारात तर चिनी बनावटीच्या वस्तू कुठेच विक्रीस दिसून येत नसल्याचे पाहायला मिळाले. पिचकाऱ्या, फुगे, रंग हे भारतीय बनावटीचेच दिसत आहेत.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Holi excitement in rural areas of palghar district ysh