डॉ. एम. एल. ढवळे मेमोरियल ट्रस्ट
पालघर : दोन दशकांपूर्वी पालघरमधील रुग्णांना उपचारासाठी मुंबई किंवा गुजरात गाठण्याशिवाय गत्यंतर नव्हते. डॉ. एम. एल. ढवळे मेमोरियल ट्रस्टने सुसज्ज रुग्णालय उभारून ही अडचण काही प्रमाणात तरी दूर केली. पालघरमधील गरीब, आदिवासी रुग्णांचा आधारवड असलेल्या या ट्रस्टला आरोग्यसेवेच्या विस्तारासाठी आर्थिक पाठबळ हवे आहे.
डॉ. एम. एल. ढवळे मेमोरियल ट्रस्टचे होमिओपॅथिक रुग्णसेवा, पदव्युत्तर शिक्षण व संशोधनाच्या क्षेत्र भरीव योगदान आहे. या संस्थेतर्फे पालघर, भोपोली (विक्रमगड) मुंबई व वडोदरा येथे होमिओपॅथिक रुग्णालय व तीन राज्यांमध्ये २० होमिओपॅथिक दवाखाने आहेत. पालघर येथे १०० खाटांचे मल्टीस्पेशालिटी एकात्मिक रुग्णालय असून, भोपोली येथे १० खाटांच्या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आरोग्यसेवेसह समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक प्रकल्प राबवले जातात.
पालघर येथील रुग्णालयात दररोज सरासरी ३०० रुग्णांवर उपचार होतात. पालघर परिसरात जिल्हा सामान्य रुग्णालय नसल्याने गरीब व गरजू रुग्णांवर तातडीने माध्यमिक स्तरावरील आरोग्य सुविधांसाठी याच रुग्णालयाचा मोठा आधार आहे. रुग्णालयात पिवळ्या रेशकार्डधारकांवर विनामूल्य, केशरी रेशन कार्डधारकांना निम्म्या दरात तर इतर रुग्णांवर माफक दरात उपचार केले जातात.
आरोग्यसेवा अधिक बळकट करण्याचा संस्थेचा मानस असून, त्यासाठी काही प्रकल्प राबविण्याचा संस्थेचा संकल्प आहे. संस्थेने त्यादृष्टीने पावले उचलली आहेत. ग्रामीण भागातील अधिकाधिक गरीब व गरजू नागरिकांना गंभीर आजारांवर उपचार मिळावेत, असा संस्थेचा प्रयत्न आहे. त्यासाठी संस्थेला आर्थिक पाठबळाची गरज आहे.