वाडा: तालुक्यातील मौजे खरिवली येथे दगडांच्या अनेक खाणी व क्रशर असून या ठिकाणी काही खाणमालकांकडून उत्खनन करताना मोठय़ा प्रमाणावर वनसंपदेचे नुकसान केले जात असल्याच्या तक्रारी खरिवली येथील ग्रामस्थांनी मुख्य वनसंरक्षक ठाणे यांच्याकडे केल्या आहेत.
वाडा तालुक्यातील खरिवलीतर्फे कोहोज या गावांत आठ ते दहा दगड खाणी व क्रशर मशीन आहेत. या ठिकाणी सलोनी ॲग्रो फार्म या कंपनीच्या जागेत तीन क्रशर मशीन सुरू आहेत. या क्रशर मशीनसाठी लागणाऱ्या दगडाचे याच ठिकाणाहून उत्खनन केले जाते. या दगड खाणीत जेसीबी, बुलडोझरच्या साह्याने उत्खनन होत असताना साग, खैर या मौल्यवान झाडांबरोबर काही औषधी वनस्पतींचेही नुकसान होत असल्याची तक्रार खरिवली येथील जिजाऊ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. कुठल्याही परवानग्या न घेता संबंधितांकडून हा प्रकार सुरू असल्याचा आरोप जिजाऊ शाखेचे अध्यक्ष आझाद अधिकारी यांनी केला आहे.
शासनाच्या सर्व प्रकारच्या परवानग्या घेऊनच या ठिकाणी खासगी मालकीच्या जागेत उत्खनन सुरू आहे. -रवी जैन, व्यवस्थापक, सलोनी ॲग्रो फार्म, खरिवली, ता. वाडा.
वन विभागाच्या विना परवानगीने झाडे तोडली गेली असतील तर निश्चितच कारवाई केली जाईल. – माधव केदार, वनरक्षक, पोशेरी क्षेत्र, ता. वाडा.

Story img Loader