कुपोषण निर्मूलनासाठी चिकू फळाचा वापर करण्याबाबत प्रशासन उदासीन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नीरज राऊत

पालघर: पालघर जिल्ह्यात सुमारे साडेसहा हजार हेक्टर क्षेत्रफळावर चिकू लागवड केली जाते. बारामाही उपलब्ध असणारे फळ स्वस्त आहे. उत्तरेकडे ‘थंडी के लड्डू’ असे त्याला संबोधले जाते. तेथे बालकांना पोषणमूल्यांच्या अनुषंगाने सेवन करण्यासाठी दिले जाते, परंतु जिल्ह्यात मानांकन मिळालेल्या या फळाचा  कुपोषण निर्मूलनासाठी वापर करण्याबाबत जिल्हा प्रशासन अजूनही उदासीन असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात चिकू क्षेत्रात प्रति हेक्टरी किमान शंभर झाडांची लागवड करण्यात आलेली आहे. प्रत्येक चिकू झाडाचे सरासरी २०० किलो वार्षिक उत्पादन असून जिल्ह्यात किमान १० कोटी किलो चिकूचे वार्षिक उत्पन्न होते.  चिकूची सरासरी विक्री १५ रुपये प्रति किलो इतक्या माफक दराने होत आहे. शिवाय या फळाची चव जिल्ह्यातील नागरिकांना रुचकर वाटत असून वाहतुकीचा खर्च कमी असतानादेखील या फळाचा वापर विविध घटकांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या पोषण आहारात झालेला नाही.

चिकू झाडावर कोणत्याही प्रकारची फवारणी केली जात नसून अधिक तर ठिकाणी सेंद्रिय पद्धतीने त्याची मशागत केली जाते. खिरणी (रायन) झाडाच्या खोडावर भेट कलम करून चिकू रोपे तयार केली जातात.    चिकूमध्ये लोह, कॅल्शियम व जीवनसत्त्व अशी पोषक मूल्य असताना कृषी विद्यापीठाकडून    त्याचा अभ्यास अपेक्षित होता. तसेच बागायतदारांनी ‘पोषणासाठी उपयुक्त फळ’ असे सादरीकरण करणे आवश्यक होते, परंतु ते न झाल्यामुळे हे फळ दुर्लक्षित राहिले आहे. 

जिल्ह्यात अडीच हजारपेक्षा अधिक कुपोषित बालके असून त्यांना अधिकतर आजार पावसाळय़ात व हिवाळय़ात होताना दिसून येतात. त्यांच्यासह गरोदर माता, स्तनदा माता तसेच सहा वर्षांपर्यंतच्या बालकांना पोषण आहार शासनातर्फे दिला जातो. त्यामध्ये माध्यान्ह सकस भोजन, अंडी, केळी, राजगिराचा लाडू, डाळी, कडधान्य, तेल याचा समावेश आहे. यापैकी अधिकतर घटक हे ७० ते १०० रुपये प्रति किलो इतक्या दराने खरेदी करण्यात येतात.  मात्र स्वस्त  असणाऱ्या चिकू फळाकडे शासनाने  दुर्लक्ष केल्याने बागायतदारांमध्ये नाराजी आहे. चिकूचे सेवन जिल्ह्यातील कुपोषित बालक तसेच गर्भवती- गरोदर मातांनी केल्यास  फळाला स्थानीय बाजारपेठ उपलब्ध होऊन देशातील इतर बाजारपेठांमध्ये चिकूची विक्री करण्याची गरज भासणार नाही. तसेच  नुकसान कमी होऊन स्थानिक अर्थकारण बदलेल असा विश्वास   बागायतदारांना आहे.

संशोधन केंद्राच्या उपयुक्ततेबाबत प्रश्नचिन्ह

कोकण कृषी विद्यापीठाचे पालघर येथे संशोधन केंद्र असून या ठिकाणी भात, गवत व भाजीपाल्यावर काही प्रमाणात संशोधन केले जाते. मात्र या भागातील नारळ, चिकू, पायरी आंबा व इतर फळ लागवडीकडे व त्यावर उद्भवणाऱ्या समस्यांकडे संशोधन केंद्राचे लक्ष नसल्याची खंत येथील शेतकरी व्यक्त करीत आहेत.

चिकूची पोषण मूल्ये

ऊर्जा: ३९१ किलो कॅलरीज

लोह: ०.८४  मिलिग्रॅम

कॅल्शियम: ६२.११  मिलिग्रॅम

जीवनसत्त्व सी: २१.३  मिलिग्रॅम

प्रथिने: ०.९४  ग्रॅम

काबरेहायड्रेट: ९०.२९  ग्रॅम

पैठणी साखर: ५२ ग्रॅम

चरबी: २.९२  ग्रॅम

झाडावरील तयार होणाऱ्या चिकू फळाच्या वेचण्याचे काम महिलावर्ग करत असून हे काम करणाऱ्या महिला व तरुणीमध्ये लोह, कॅल्शियम तसेच रक्ताची कमतरता सहसा आढळून येत नाही. यावरून चिकू फळातील पोषण मूल्यांचे महत्त्व दिसून येते. कृषी विद्यापीठांनी चिकू फळाविषयी सखोल संशोधन करून या फळाचा वापर कुपोषण निर्मूलन करण्यासाठी योग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यास स्थानिक बागायतदारांना मोठय़ा प्रमाणात दिलासा मिळेल, तसेच चिकू लागवड क्षेत्र वाढू शकेल.

-प्रभाकर सावे, प्रयोगशील शेतकरी, घोलवड