पालघर : पालघर जिल्ह्यातील नांदगांव तर्फे तारापुर येथील तलाठी कार्यालय हे जुनाट व अपुर्‍या जागेतील समाजमंदिर येथे गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. नांदगाव तर्फे तारापूर ग्रामपंचायतीने नव्याने बांधलेल्या मालकीच्या इमारतीत अनेक कार्यालय रिक्त असताना देखील तलाठी कार्यालय तेथे स्थलांतरित झालेले नाही. त्यामुळे मार्च महिन्यात तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी स्थलांतराबाबत दिलेल्या आदेशानंतर देखील कार्यालय स्थलांतरित होण्यात कोणत्या अडचणी येत आहेत असा सवाल संतप्त नागरिक विचारत आहेत.

पालघर तालुक्यातील नांदगाव तर्फे तारापूर येथील तलाठी कार्यालय हे गेल्या अनेक वर्षांपासून अपुऱ्या व स्वच्छतागृह नसलेल्या जागेत एका समाज मंदिराच्या छोट्या खोलीत कार्यरत आहे. या समाज मंदिराच्या कार्यालयाची इमारत जीर्ण झाली असून धोकादायक झाली आहे. या तलाठी कार्यालयात नांदगांव गावातील तसेच आजुबाजूच्या गावातील ग्रामस्थ कामानिमित्त येत असतात. त्या ग्रामस्थांची बसण्याची व्यवस्था व स्वच्छतागृह नसल्याने कुचंबणा होत आहे. त्यामुळे येथे काम करणारे कर्मचारी व कामाकरीता येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत असते.

नवीन जागेत तलाठी कार्यालय स्थलांतरीत करण्याबाबत ग्रामपंचायत नांदगांव तर्फे तारापुरच्या ऑगस्ट २०२३ च्या ग्रामसभेत एकमताने तलाठी कार्यालय नांदगांव तर्फे तारापुर ग्रामपंचायतच्या नवीन इमारतीत स्थलांतरीत करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. नांदगाव तर्फे तारापूर ग्रामपंचायतीने स्वतःच्या मालकीची प्रशस्त इमारत बांधली असून त्यामध्ये तलाठी कार्यालयासह पोस्ट व इतर कार्यलयासाठी कार्यालय देण्यात आले आहे. मात्र तरीही तलाठी नवीन कार्यालयात न जाता जुन्यात कार्यालयात बसत आहे.

कार्यालय स्थलांतरित न झाल्यामुळे कार्यालयीन कामाकरिता येणाऱ्या ग्रामस्थांना अडचणी निर्माण होत आहे. नांदगांव तर्फे तारापुर ग्रामपंचायतीने व इतर ग्रामस्थांनी तलाठी कार्यालय स्थलांतरीत करणेबाबत बरेच पत्रव्यवहार केलेले आहेत. परंतु अद्यापही तलाठी कार्यालय ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीत स्थलांतरीत करण्याची परवानगी महसूल विभागाने दिलेली नाही.

याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी नांदगाव तर्फे तारापूर येथील तलाठी यांनी ग्रामपंचायतीच्या नवीन तलाठी कार्यालयातून कामकाज पाहण्याचे आदेश ३ मार्च २०२५ रोजी दिले होते. तसेच संतप्त ग्रामस्थांनी पालकमंत्री गणेश नाईक यांना जनता दरबारात कार्यालय स्थलांतरित करण्याबाबत तक्रार केली होती. मात्र जिल्हाधिकारी यांनी दिलेला आदेशाला दीड महिना उलटला असून देखील तलाठी कार्यालयाचे कामकाज हे जुन्याच इमारतीतून सुरू आहे. नवीन इमारत उपलब्ध असताना तसेच त्या इमारतीत अनेक कार्यालय हे रिक्त असताना देखील जुन्यात इमारतीतून कामकाज सुरू असल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

याबाबत नांदगाव तर्फे तारापूर गावच्या तलाठी यांच्याशी संपर्क साधला असता तहसील कार्यालयातून आदेश आल्यावर आम्ही कार्यालय स्थलांतरित करू असे सांगण्यात आले आहे.

तलाठी कार्यालय स्थलांतरित करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी पत्र दिले होते. त्यानंतर कार्यालय स्थलांतरित करणार होतो. मात्र त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी स्थलांतर थांबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे अद्याप स्थलांतर होणे बाकी असून हा सर्व कारभार प्रांत विभागाकडे आहे. – रमेश शेंडगे, तहसीलदार

जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊन नंतर पुन्हा स्थलांतर थांबविण्यास का सांगितले याबाबत आपल्याला काहीही कल्पना नाही. – सुनील माळी, प्रांत अधिकारी