वाडा: ग्रामीण भागांत एसटीची बस सेवा काही ठिकाणी बंद तर काही ठिकाणी सेवा कमी केल्यामुळे बेकायदा खासगी वाहनातील प्रवासी वाहतुकीला चांगलीच मोकळीक मिळाली आहे. त्याचा आर्थिक भुर्दंड प्रवाशांना बसला आहे. बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्याही वाढली आहे. बोईसर, जव्हार, डहाणू, पालघर, वाडा या ग्रामीण भागांत एसटी बस आगार आहेत. आगारातील बहुतांशी बसेसच्या फेऱ्या ठाणे, नाशिक, कल्याण, भिवंडी, अहमदनगर या शहरी भागांतच अधिक असतात. ग्रामीण भागात अत्यंत कमी उत्पादन मिळत असल्याचे एसटी बस प्रशासनाकडून सांगण्यात येते. परिणामी ग्रामस्थांना बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर अवलंबून राहावे लागते. त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. ग्रामीण भागात जाणाऱ्या बहुतांश बस या वेळेवर सुटत नाहीत, ग्रामीण भागांत दिल्या जाणाऱ्या बस ह्या जुन्या असल्याने त्या नेहमीच रस्त्यातच नादुरुस्त होतात, फेऱ्यांचे वेळापत्रक बनविताना प्रवाशांना गृहीत न धरता पूर्ण सवलतीमध्ये प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळा गृहीत धरल्या जातात यामुळे एसटी तोटय़ात जाते, अशी प्रवाशांची तक्रार आहे. मात्र त्यावर उपाययोजना केली जात नसल्याने त्यांच्यात नाराजी आहे.
मिनी बसेसची गरज
सात-आठ वर्षांपूर्वी ग्रामीण भागांसाठी फक्त चालक असलेल्या आणि २० ते २५ प्रवाशांची क्षमता असलेल्या बस प्रत्येक आगारामध्ये होत्या. या बसच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाला चांगले उत्पन्न मिळत होते. मात्र या मिनी बसेस सध्या बंद करण्यात आल्या आहेत. त्या पुन्हा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
दोन हजार बेकायदा प्रवासी वाहने
पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या दोन हजारांहून अधिक मॅजिक, मिनिडोअर, जीप अशा बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांतून ग्रामस्थ प्रवास करतात. त्यांच्याकडून जादा दराने भाडे आकारणी होते. परंतु बस नसल्यामुळे प्रवाशांना हा नाहक भुर्दंड बसत आहे. ग्रामीण भागांत दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दीड लाखांहून अधिक आहे.
सर्वच बस आगारांमध्ये गाडय़ांची संख्या कमी झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. येत्या काही दिवसांत नव्याने बसगाडय़ा खरेदी केल्या जाणार आहेत. त्या वेळी निश्चितच ही समस्या मार्गी लागेल.
-अशिष चौधरी, विभागीय वाहतूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग, पालघर
वेळेचे नियोजन करून ग्रामीण भागात मिनी बसेस पुन्हा सुरू केल्या तर एसटी महामंडळाच्या उत्पन्नातही वाढ होईल व प्रवाशांनाही सुविधा मिळेल.
-डी.व्ही.पाटील, सेवानिवृत्त एसटी कर्मचारी.