डहाणू: डहाणू नाशिक राज्य मार्गावर नुकताच नव्याने बांधण्यात आलेल्या रानशेत येथील पुलामुळे कालव्याच्या पाण्याच्या प्रवाहावर मोठा परिणाम होणार असल्याचे सांगितले जात आहे. पुलाची बांधणी करताना सार्वजनिक बांधकाम विभागाने पाटबंधारे विभागाशी समन्वय साधला नसल्यामुळे पुलाच्या बांधणीत चुका झाल्या असून यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे.
डहाणू नाशिक राज्यमार्गावर रानशेत आणि सारणी येथील १९८५ साली बांधण्यात आलेले कालव्यांवरील पुल जीर्ण झाल्यामुळे या पुलांच्या पुनर्बांधणीची गरज निर्माण झाली होती. याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाटबंधारे विभागाशी सन २०२० पासून पत्रव्यवहार सुरू असून पाटबंधारे विभागाकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या पुलांच्या पुनर्बांधणीसाठी निधी मंजूर करून देण्यात आला. रानशेत येथील दोन आणि सारणी येथील एक अश्या तीन पुलांसाठी १ कोटी ५६ लाख ५० हजार निधी मंजूर करण्यात आला असून डिसेंबर महिन्यात काम सुरू करण्यात आले.
हेही वाचा >>>बोईसर : युरिया खताच्या बेकायदा साठ्यावर कारवाई
सारणी येथील पुलाचे काम सुरू असताना ५ डिसेंबर आणि २१ डिसेंबर रोजी पाटबंधारे विभागाने पत्राद्वारे पुलाची बांधणी चुकीची होत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून दिले. मात्र याकडे दुर्लक्ष करून सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाचे काम पूर्ण केले असून यामुळे पाण्याच्या प्रवाहावर मोठा परिणाम होणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात येत आहे.
यापूर्वीच्या पुलाची रुंदी खालील भागात ५.८ मिटर असून नव्याने बांधण्यात आलेल्या पुलांची रुंदी खालच्या टोकाला ३.८ मिटर आहे. यामुळे पुलाची रुंदी कमी झाली असून पाण्याच्या प्रवाहावर मोठा परिणाम होऊन फुगवट्या मुळे मागील भागातील कालव्यांचे देखील नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे. तसेच शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचवण्यात अडचणी निर्माण होऊन शेतकऱ्यांना पुरेसा पाणी पुरवठा करता येणार नाही. परिणामी उन्हाळी शेतीवर याचा मोठा परिणाम होणार असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
हेही वाचा >>>पाण्याची टाकी उभारणीवरून झालेल्या वादात ४० आदिवासी बांधवांवर बहिष्कार, डहाणू तालुक्यातील सिसने गावातील प्रकार
सारणी येथील नवीन पुलामुळे पाणी प्रवाहात अडथळे निर्माण झाले असून यामुळे पाण्याच्या प्रवाहावर मोठा परिणाम होणार आहे. पुलं बांधतांना सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे पाणी प्रवाहात अडसर निर्माण झाले आहेत. याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना देण्यात आल्या असून पाण्याचा प्रवाह पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी पाटबंधारे विभागाला कळवले आहे. – योगेश पाटील, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग पालघर
डहाणू तालुक्यातील राज्य मार्गावर कालव्यांवरील एकूण सहा पुल जीर्ण झाले असून याविषयी पाटबंधारे विभागाशी २०२० पासून पत्रव्यवहार सुरू आहे. मात्र त्यांच्याकडून योग्य सहकार्य मिळत नसल्यामुळे आम्ही आमच्या स्तरावरून पुलांसाठी निधी मंजूर करून आणला असून कामे सुरू केली आहेत. दरम्यान पुलाचे काम सुरू झाल्यानंतर पाटबंधारे विभागाकडून पत्र प्राप्त झाले असून त्याविषयी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. – अजय जाधव, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग डहाणू