पालघर जिल्हा राज्याच्या यादीत तळाला; आतापर्यंत साडेसहा लाख जणांचे लसीकरण

पालघर : पालघर जिल्ह्यात आतापर्यंत सहा लाख ६४ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. लसपुरवठा करण्याच्या राज्यातील यादीत जिल्हा तळाला असल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्ह्यातील प्रतिलाख लोकसंख्येच्या आधारे लस घेण्यात आलेल्यांची  संख्या २० हजार पेक्षा कमी इतका असून मुंबई लगत व एमएमआर क्षेत्रात असणाऱ्या या जिल्ह्यकडे लस वितरणाच्या बाबतीत दुजाभाव झाल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत पाच लाख दहा हजार नागरिकांनी करोना प्रतिबंध लसीची पहिली मात्रा तर सुमारे दीड लाख नागरिकांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली आहे. मे महिन्यापासून पालघर जिल्ह्याला तीन लाख एक हजार १०० कोविशील्ड तर ३० हजार ८६० कोवॅक्सिन लस प्राप्त झाल्या आहेत. केंद्र व राज्य सरकारकडून पुरवण्यात आलेल्या कोविशील्ड लसमात्रेमध्ये मे महिन्यात एक लाख ४१ हजार ४००, जून महिन्यात एक लाख चार हजार ७०० तर जुलै महिन्यात जेमतेम ५५ हजार लस जिल्ह्यासाठी प्राप्त झाली आहे. त्यापैकी जिल्ह्यच्या ग्रामीण भागांत एक लाख ५६ हजार सहाशे तर वसई- विरार महानगरपालिका क्षेत्रात एक लाख ४४ हजार पाचशे लशींचे वितरण करण्यात आले आहे. प्राप्त झालेल्या कोवॅक्सिन लशीची शहरी व ग्रामीण भागांत समान प्रमाणात वितरण झाले आहे.

पूर्वी जिल्ह्यात ७० ते १०० ठिकाणी दररोजची लसीकरण शिबिरे आयोजित केली जात होती. मात्र लशीच्या मात्रेची उपलब्धता मर्यादित राहिल्याने सध्या जिल्ह्यात लसीकरण आठवडय़ातून काही निवडक दिवशी ३० ते ३५ ठिकाणीच लसीकरण हाती घेण्यात येत आहे. त्यामध्ये सात ते दहा खासगी लसीकरण केंद्रांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील लसीकरणाची दैनंदिन क्षमता ५५ ते ६० हजार नागरिकांची असताना जिल्ह्यात आठवडय़ाला जेमतेम पाच ते सहा हजार लसीकरण गेल्या काही दिवसांपासून होत आहे. लोकसंख्येवर आधारित लशींच्या वितरणाचा विचार केला तर राज्यातील ३६ जिल्ह्यंपैकी पालघर जिल्हा ३५ व्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात नागरिकरण व औद्योगिकीकरण झालेले असताना पालघर जिल्ह्याला लस वितरणात राज्य सरकारने दुजाभाव केल्याचे दिसून आले आहे. लोकप्रतिनिधींनी या करिता राज्यस्तरावर पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

जिल्हा प्रशासनाचे नियोजन

आगामी काळात लशीचे मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल या अपेक्षेने प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असणाऱ्या रुग्ण कल्याण समितीच्या माध्यमातून नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लशीच्या उपलब्धतेप्रमाणे गावनिहाय प्राधान्याने लसीकरण मोहीम राबवणे विचाराधीन आहे. त्याचबरोबर लसीकरणाच्या सत्रादरम्यान १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांसाठी दुपारच्या सत्रात तर ४५ वरील नागरिकांना सकाळी पहिल्या सत्रामध्ये लसीकरण हाती घेण्याची नियोजित करण्यात आले आहे. या खेरीज गरोदर मातांसाठी ‘ग्रीन कॉरिडोर’ उपलब्ध करण्याची व्यवस्था आखण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य विभागाने सांगितले.

प्रति एक लाख लोकसंख्येच्या तुलनेत लसीकरण

आदिवासी जिल्हे: जिल्हा  लस संख्या

  • पालघर  १९७००
  • अमरावती   २४१००
  • नासिक  २४६००
  • गडचिरोली   २६३६४
  • नंदुरबार २६४००

बिगर आदिवासी जिल्हे: जिल्हा  लस संख्या

  • पुणे ५३०००
  • नागपूर  ३९०००
  • कोल्हापूर ३६४००
  • भंडारा   ३७०००
  • सिंधुदुर्ग ३५६००
  • सांगली  ३३९००
  • सातारा  ३३६००