बोईसर : समुद्रकिनार्यावर भरधाव वेगाने कार चालवून स्टंटबाजी करणे तरुणांच्या चांगलेत अंगलट आले. भरधाव वेगातील कारचा मागचा टायर फुटून कार उलटल्याने पाच तरुण किरकोळ जखमी झाल्याची घटना चिंचणी समुद्रकिनार्यावर गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी वाणगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
डहाणू तालुक्यातील चिंचणी समुद्रकिनारा पर्यटकांमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे. स्वच्छ, सुंदर आणि लांबलचक किनार्यामुळे या ठिकाणी स्थानिक आणि बाहेरील पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. गुरुवारी संध्याकाळी बोईसर येथील शैलेश अमरजीत यादव (२१) हा चालक व सोबत असलेले चार तरुण आपल्या ताब्यातील अर्टिगा कार समुद्र किनार्यावर (एम.एच.४८ बीटी.७५२६) भरधाव वेगाने चालवून स्टंटबाजी करीत होते. या तरुणांची स्टंटबाजी सुरू असताना कारचा मागचा टायर फुटल्याने कार आंनियंत्रित होऊन उलटली. या अपघातात कारमधील तरुणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. अपघात होताच कारमधील तीन तरुण पसार झाले. याप्रकरणी समुद्रकिनार्यावर वाहन चालविण्यास बंदी असताना देखील भरधाव वेगाने वाहन चालवत रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक शैलेश यादव याच्याविरोधात वाणगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : बोईसर : रुग्णवाहिकेतून दारूची तस्करी भरारी पथकाकडून उघड, नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त, चालक पसार
समुद्रकिनार्यावर वाहने घेऊन जाण्यास बंदी असताना देखील सर्रासपणे होतेय उल्लंघन :
चिंचणी समुद्र किनार्यावर बेशिस्त आणि मद्यपी पर्यटकांनी धुडगूस घालण्याच्या घटना या पूर्वी देखील अनेक वेळा घडल्या आहेत. १२ जुलै २०२१ रोजी मुंबई येथून आलेल्या काही मद्यधुंद पर्यटकांनी चिंचणी समुद्रकिनार्यावर धिंगाणा घालीत असताना त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच या मद्यधुंद पर्यटकांनी अंगावर गाडी घालण्याचा तसेच धक्काबुक्की करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचप्रमाणे २०२२ साली प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी चिंचणी समुद्रकिनाऱ्यावर एका कारने दोन पर्यटकांना धडक दिली होती. यामध्ये एका महीलेचा मृत्यू झाला होता तर एक तरुणी गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. १५ मार्च रोजी बोईसर मधील काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यानी भर समुद्र किनार्यावर धावत्या कारच्या टपावर बसून आरडाओरड करीत मोठा धिंगाणा घालण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी स्थानिकांनी धिंगाणा घालणार्या विद्यार्थ्यांना पकडून त्यांची चांगलीच कान उघाडणी केल्यावर माफी मागत या विद्यार्थ्यानी समुद्र किनार्यावरून काढता पाय घेतला होता.
हेही वाचा : पालघर शहरात हवेचा दर्जा घसरला; अनेकांना श्वसनासंबंधित त्रास
चिंचणीचा स्वच्छ, विस्तृत आणि नयनरम्य समुद्रकिनारा राज्यात अतिशय प्रसिद्ध असून या ठिकाणी मुंबई, ठाणे, नाशिक सोबतच संपूर्ण पालघर जिल्ह्यातील पर्यटक मोठ्या संखेने गर्दी करतात. सुट्टीच्या दिवशी तर किनारा गर्दीने फुलून जातो. किनार्यावर पर्यटकांसाठी खाद्यपदार्थ्यांच्या गाड्यांसोबतच घोडागाडी, उंट सफारी सारख्या मनोरंजनाच्या सोयीदेखील उपलब्ध आहेत. या सुंदर समुद्र किनार्याला काही बेशिस्त आणि मद्यपी पर्यटकांमुळे गालबोट लागले आहे. किनार्याकडे जाणारा रस्ता हा अतिशय अरुंद असल्यामुळे संध्याकाळी गर्दीच्या सुमारास मोठी वाहतूक कोंडी होते. समुद्र किनाऱ्यावर जाण्यासाठी मुख्य रस्त्यासोबत आणखी दोन तीन आडवळणाच्या वाटा असून काही पर्यटक या वाटांचा वापर आपली वाहने किनाऱ्यावर घेऊन जाण्यासाठी करतात. त्याच सोबत पर्यटक आपली दुचाकी आणि चारचाकी वाहने थेट समुद्रकिनार्यावरील वाळूत घेऊन जाऊन स्टंटबाजी करण्याचे प्रकार वारंवार होत आहेत. लांबलचक व सपाट किनार्यामुळे अनेक शिकाऊ वाहनचालकांना प्रशिक्षित करण्यासाठी या किनार्याचा नेहमीच गर्दी असते. चिंचणी समुद्रकिनार्यावर मौजमज्जा करण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या ठिकाणी कोणतीच यंत्रणा उपलब्ध नसून स्थानिक ग्रामपंचायतीने वाहन पार्कींगचे शुल्क वसूली करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र ठेकेदाराला न जुमानता अनेक पर्यटक बिनधास्त आपली वाहने घेऊन थेट समुद्र किनार्यावर घुसखोरी करताना दिसतात.
हेही वाचा : डहाणू नगर परिषदेच्या हद्दीत असणाऱ्या आंबेडकर नगर मधील सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था
“चिंचणी समुद्रकिनार्यावर येणार्या पर्यटकांच्या वाहनांसाठी पार्कींगची व्यवस्था ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आली असून यासाठी ठेकेदारची नियुक्ती करण्यात आली आहे. किनार्यावर वाहने घेऊन जाण्यास बंदी असून तशी सक्त सूचना ठेकेदाराला देण्यात आली आहे. यापुढे बंदीचे उल्लंघन करणार्या पर्यटकांवर कारवाई करण्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात येणार आहे.” – मेघा देवानंद शिंगडे, सरपंच, चिंचणी ग्रामपंचायत.