बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील वाढते प्रदूषण आणि असुविधा यांवर उपाययोजना आखण्यासाठी तसेच प्रदूषण नियंत्रणात अपयशी ठरल्याबद्दल खासदार राजेंद्र गावित यांनी सबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. गावित यांच्या अध्यक्षतेखाली टीमा सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत औद्योगिक क्षेत्र आणि परिसरातील लोकप्रतिनिधी आणि स्थानिक ग्रामपंचायतींचे सरपंच, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वी पालघर तालुक्यातील नवापूर आणि मुरबे खाडी किनारी मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडल्याचा प्रकार समोर आला होता. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील काही कारखाने आणि संयुक्त सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच चोरीछुपे नाले आणि पाईपलाईनद्वारे थेट समुद्रात सोडण्यात येत असल्यामुळे मासे मृत्युमुखी पडल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि मच्छीमार यांनी केला होता.

हेही वाचा : डहाणू: विवळवेढे गडावर थरारक घटना, दरीत गिर्यारोहक पडूनही वाचला जीव..

औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यातून होणाऱ्या बेसुमार जल आणि वायू प्रदुषणामुळे परिसरातील बोईसर, सरावली, खैरेपाडा, कोलवडे, कुंभवली, पाम, नवापूर, नांदगाव, मुरबे, सालवड, पास्थळ या ग्रामपंचायत हद्दीतील शेती, बागायती, मासेमारी, पाण्याचे स्त्रोत यांना गंभीर धोका पोहोचत आहे. त्याचप्रमाणे नाले आणि खाडीवाटे प्रदूषित रासायनिक सांडपाणी समुद्रात सोडले जाण्याचे प्रकार होत असल्याने मत्स्य उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे आरोप होत आहेत. याविरोधात वारंवार तक्रारी करून सुद्धा सबंधित विभाग याची दखल घेत नसल्यामुळे खासदार राजेंद्र गावित यांच्या अध्यक्षतेखालील बैठक बोलावण्यात आली होती.

हेही वाचा : पालघर: अंमली पदार्थ विक्री प्रकरणात चिंचणी येथून दोघे पोलिसांच्या ताब्यात

बैठकीला खासदार राजेंद्र गावित, टीमाचे अध्यक्ष वेलजी गोगरी, शिवसेना उपनेत्या ज्योती मेहेर, जिल्हाप्रमुख कुंदन संखे, जिल्हा महीला संघटक वैदेही वाढाण, मनसेचे जिल्हाप्रमुख समीर मोरे आणि परिसरातील ग्रामंचायतीचे सरपंच उपस्थित होते. यावेळी औद्योगिक क्षेत्रातील असुविधा आणि प्रदूषणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी उदय किसवे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी रवींद्र आंधळे, उप प्रादेशिक अधिकारी राजू वसावे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली.

हेही वाचा : शेतात आगडोंब… भाताचे उडवे खाक

या बैठकीत जुने आणि नवे सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र (सीईटीपी) तारापूर एन्व्हायरोमेंट प्रोटेक्शन सोसायटी (टीईपीएस ), सडेकर एन्व्हायरो इंजिनिअरिंग प्रा.लि., ई अँड वाय संस्था इत्यादींच्या कार्यपद्धतीवर आक्षेप व्यक्त घेण्यात आला. टीईपीएस व ई अँड वाय या संस्था ताबडतोब बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली. निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कारवाई, रात्रीच्या वेळी नाल्यात टँकरद्वारे अनधिकृत प्रदूषित रासायनिक सांडपाणी सोडून पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या केमिकल माफियांवर कारवाई, नवापूर येथील अपूर्ण अवस्थेत असलेली रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन, कारखान्यातून नाल्यात सोडणारे प्रदूषित सांडपाणी, पर्यावरणाचे नियम पायदळी तुडवणाऱ्या उद्योगांवर कारवाई, नवीन सीईटीपीची कार्यक्षमता, स्थानिकांना रोजगार किती दिला त्या करीता चौकशी समिती नेमावी, परिसरातील जैवविविधतेची तपासणी तसेच माती व पाणी परीक्षण, राष्ट्रीय हरित लवादाने उद्योगांकडून वसूल केलेल्या दंडाच्या रकमेचा योग्य विनियोग, प्रत्येक कारखान्यातील इटीपी यंत्रणा, नाल्यावर बंधारे, एका उद्योगाला एकच पाणी कनेक्शन इत्यादी प्रश्न उपस्थित करून अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In boisar mp rajendra gavit reprimanded the officers of mpcb for pollution in tarapur area css
Show comments