बोईसर : बोईसर चिल्हार मार्गावरील एका गोदामावर छापा टाकून शेतीच्या वापरासाठी असलेल्या युरिया खताचा संशयित साठा बोईसर पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी गोदामाच्या मालकाचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री बोईसर चिल्हार मार्गावर पोलिसांची गस्त सुरू असताना गुंदले येथील वाघोबा खिंडीजवळ आतल्या रस्त्यावर काही तरुण पोलिसांना बघून पळून गेले. पोलिसांनी संशयावरून या ठिकाणी असलेल्या एका बंद गोदामाची तपासणी केली असता त्या ठिकाणी शेतीच्या वापरासाठी असलेल्या युरिया खताचा तीन टन बेकायदा साठा आणि दोन वाहने पोलिसांना आढळून आली.
हेही वाचा : पालघरमध्ये भाजपच्या तयारीनंतरही शिंदे गट ठाम
याची माहिती पालघर कृषी विभागाला दिल्यानंतर कृषी विभागाचे जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक प्रकाश राठोड आणि लक्ष्मण लामकाने यांनी गोदामातील साठ्याचे नमुने घेत साठा ताब्यात घेतला आहे. गोदामातील युरियाचा बेकायदा साठा आणि गोदामाचे मालक यांचा बोईसर पोलिसांमार्फत शोध घेतला जात असून अधिक चौकशी सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान चौधरी हे करीत आहेत.