बोईसर : बोईसर चिल्हार रस्त्यावर भरधाव ट्रेलरने दोन शाळकरी विद्यार्थांना चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात एका शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून विद्यार्थिनी जखमी झाली आहे. जखमी विद्यार्थिनीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून ट्रेलर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तारापूर एमआयडीसीला जोडणाऱ्या बोईसर चिल्हार रस्त्यावरील नागझरी येथे शुक्रवारी सकाळी लालोंडे येथील विद्या विनोद अधिकारी या शाळेत जाण्यासाठी पायी निघालेल्या चरी गावातील दोन विद्यार्थ्यांना पाठीमागून आलेल्या भरधाव वेगातील ट्रेलर ने धडक दिली. ट्रेलर च्या धडकेत निखिल काळूराम गिऱ्हाणे,वय १४ वर्षे या आठवीतील विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला तर या अपघातात सोनाली दांडेकर,वय १६ वर्षे ही दहावीत शिकणारी विद्यार्थिनी जखमी झाली असून तिच्यावर नागझरी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातास कारणीभूत ट्रेलर चालकास मनोर पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी पोलिस निरीक्षक सतीश शिवरकर हे अधिक चौकशी करीत आहेत. दरम्यान पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. गोविंद बोडके यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ आणि रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली.

हेही वाचा : ‘वाढवण’साठी स्वतंत्र पायाभूत सुविधा; पालघर जिल्ह्याचा आर्थिक स्तर तिपटीने वाढण्याचा दावा

तारापूर औद्योगिक वसाहतीला जोडणारा बोईसर चिल्हार हा रस्ता वाहतुकीस अतिशय धोकादायक बनला आहे. रस्त्याचा असमतल पृष्ठभाग, तुटलेले दुभाजक, रखडलेले चौपदरीकरण, अनेक ठिकाणी गायब असलेल्या साईडपट्ट्या, सूचना फलकांचा अभाव या सारख्या अनेक तृटी असून सुरक्षित उपाय योजना आखण्यात एमआयडीसी चे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरीक करीत आहेत. गुंदले येथील वाघोबा खिंड आणि नागझरी – लालोंडे गावांच्या हद्दीत वाहनातील आरएमसी, खडी आणि इतर बांधकाम साहित्य रस्त्यावर सांडून रस्ता लहान वाहने आणि पादचारी यांच्यासाठी अतिशय धोकादायक बनला आहे. या सर्व बेकायदा आणि नियमभंग करणाऱ्या बाबींवर कारवाई करण्यास प्रादेशिक परिवहन विभाग आणि जिल्हा वाहतूक शाखा डोळेझाक करीत आहेत.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In boisar speeding trailer crushes school children one student dies one injured css