डहाणू : प्रस्तावित वाढवण बंदराला स्थानिकांचा तीव्र विरोध असताना डहाणू रोड रेल्वे स्थानक, बस स्थानक परिसरात बंदराच्या समर्थनार्थ जाहिरात फलक लावल्यामुळे स्थानिक आक्रमक झाले आहेत. बंदर उभारणीचा प्रश्न न्यायालयात न्यायप्रविष्ठ असताना डहाणू रोड रेल्वे स्थानक आणि इतर ठिकाणी बंदराच्या समर्थनार्थ जाहिरात फलक लावण्यात आल्यामुळे वाढवण बंदर विरोधी संघटना आणि स्थानिकांनी संतप्त होत जाहिरात बाजी अनधिकृत असल्याचा आरोप करत रविवार २६ नोव्हेंबर रोजी रेल्वे स्थानक आणि डहाणू पोलीस ठाण्यात जाहिरात फलक काढण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
हेही वाचा : वादळी वाऱ्याने प्रवाशांचे मेगा हाल; झाडे कोसळल्याने अनेक रस्त्यावरील वाहतूक काही तास ठप्प
बंदराला तीव्र विरोध असताना बंदराच्या समर्थनार्थ जाहिरात फलक लावण्यात येत असल्यामुळे वाढवण बंदर विरोधी संघटना आणि स्थानिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. बंदराच्या समर्थनार्थ जाहिरात फलक प्रसिद्ध करण्यासाठी तीव्र विरोध दर्शवण्यात येत असून जाहिरात फलक न काढल्यास बंदर विरोधी संघटनांकडून आक्रमक भूमिका घेतली जाईल असा इशारा देण्यात आला आहे. तसेच यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला संबंधित शासकीय यंत्रणा जबाबदार असतील असा इशारा बंदर विरोधी संघटनांनी दिला आहे.