डहाणू : डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी देवीच्या गडावर दर्शनासाठी गेलेल्या तरुणाचा मंगळवार १४ जानेवारी रोजी हृदय विकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. उपाशी पोटी गड चढून गेल्यामुळे तरुणाची प्रकृती खालावली असून त्याला हृदय विकाराचा झटका आल्याचा अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे.
तलासरी तालुक्यातील वेवजी येथील मिलन डोंभरे (२५) हा आपली पत्नी, भाऊ आणि कुटुंबीयांसह मंगळवारी महालक्ष्मी गडावर दर्शनासाठी गेला होता. गडावर चढून खाली उतरत असताना अचानक त्याला अस्वस्थता जाणवली असून उलट्या झाल्यामुळे त्याची प्रकृती खालावली. कुटुंबीयांनी त्याला धीर देत गडावरून खाली आणण्याचं प्रयत्न केला मात्र रस्त्यातच त्याला हृदय विकाराच्या झटका येऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कुटुंबियांनी त्याला गडावरून खाली उतरवत ११.३० वाजता कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचा वाटेतच मृत्यू झाल्याचे घोषित केले आहे.
हेही वाचा : शहरबात: रेल्वे प्रवासी उपेक्षित
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मिलन डोंबरे याला शारीरिक कसरतीची सवय नसून उपाशी पोटी गडावर गेल्यामुळे त्याची प्रकृती खालावली असावी. आणि त्यामुळेच त्याला हृदय विकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यु झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शारीरिक कसरतीची सवय नसल्यास योग्य ती काळजी घेऊन उंच ठिकाणी अथवा डोंगरावर चढावे असे आवाहन कासा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी हेमंत बेहरे यांनी केले आहे.