डहाणू : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सोमवार २३ सप्टेंबर रोजी तवा येथील आदिवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या दोन विद्यार्थांना एक भरधाव ट्रकने धडक देत अपघात केला असून यामध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत येणाऱ्या डहाणू तालुक्यातील तवा आश्रमशाळेत अनिवासी म्हणून १२ वी इयत्तेत शिकणारे सुधीर पुंजारा (१७) व सनी तांबडा (१७) हे दोघे कॉलेज सुटल्यानंतर संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास चिंचपाडा येथे घराकडे जात असताना दोघांना मुंबईकडे भरधाव वेगात जाणाऱ्या एक आयसर टेम्पोने पाठीमागून धडक देत अपघात केला आहे. यामध्ये सुधीर याचा टेम्पो खाली चिरडून जागीच मृत्यू झाला असून सनी तांबडा हा विद्यार्थी जखमी झाला आहे. टेम्पो चालकाने जखमींना रुग्णालयात न नेता वाहनासह घटनास्थळावरून पळ काढला आहे.

हेही वाचा : शहरबात…. समुद्रात विमानतळ उभारण्यात अडचणी

परिसरातील नागरिकांनी जखमी विद्यार्थ्याला तत्काळ कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्याला पुढील उपचारासाठी वेदांत रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. सध्या सनी याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच कासा पोलीस ठाणे प्रभारी अविनाश मांदळे यांनी घटनास्थळी भेट दिली असून या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.