डहाणू : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर मधील तलासरी तालुक्यातील आच्छाड परिसरात रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरू असताना नव्याने तयार केलेल्या रस्त्यावर एका दुचाकी स्वाराने अनवधानाने दुचाकी चढवली असून काँक्रिट ओले असल्यामुळे दुचाकीची चाके काँक्रिट मध्ये रुतल्याचा प्रकार बुधवार २ एप्रिल रोजी समोर आला आहे. दुचाकी वर एकट्याने प्रवास करणाऱ्या दुचाकी स्वाराची दुचाकी काँक्रिट मध्ये रुतल्यामुळे चालकाची दुचाकी काढण्यासाठी सुरू असलेल्या धडपड कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
राष्ट्रिय महामार्गावर सुरू असलेल्या काँक्रीटीकरण कामामध्ये योग्य नियोजन अभावी अनेक वेळा ओल्या काँक्रिट रस्त्यांवर वाहने चढवल्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. सध्या तलासरी तालुक्यातील आच्छाड हद्दीत गुजरात वाहिनीचे काँक्रीटीकरण काम सुरू असून या ठिकाणी एका दुचाकीस्वाराला ओल्या रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे त्याने ओल्या रस्त्यावर वाहन चढवले आणि यामुळे दुचाकीची चाके एक फूट पर्यंत काँक्रिट मध्ये रुतल्याचे दिसून आले.
राष्ट्रिय महामार्गावर काँक्रीटीकरण करताना आवश्यक सूचना फलक, सुरक्षा रक्षक, गतिरोधक आदी. सुरक्षा उपाययोजनांचा अभाव असल्यामुळे अनेक वेळा चालकांची दिशाभूल होऊन अनुचित प्रकार घडत आहेत. काँक्रीटीकरण करताना अनेक वेळा पर्यायी मार्ग म्हणून उलट्या दिशेवरील पहिली मार्गिका वाहतुकीसाठी ठेवण्यात येते. यासाठी सिमेंटचे बॅरिकेड्स महामार्गावर ठेवले जातात. या बॅरिकेड्स ला धडकून अनेक वेळा अपघात झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. यावर उपाययोजना करण्याच्या सूचना वेळोवेळी महामार्ग प्रशासनाला देऊन सुद्घा याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांकडून महामार्ग प्रशासनाच्या कार्यपद्धती विरोधात रोष व्यक्त होत आहे.
बुधवारी घडलेल्या घटनेनंतर परिसरातून महामार्ग प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर टीकेची झोड उठत आहे. ओल्या काँक्रिट रस्त्यावर वाहने गेल्यानंतर कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नसल्याचे बोलले जात आहे. अनेक वेळा हे रस्ते सुकल्यानंतर यांच्यावर वाहनांच्या चाकांचे निशाण उमटल्यामुळे छोटे खड्डे तयार होतात. यामध्ये दुचाकीची चाके आदळून अपघात होण्याची शक्यता निर्माण होत आहे. याविषयी महामार्ग प्रशासनाकडून वेळीच योग्य उपाययोजना होत नसल्यामुळे चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पालघर जिल्ह्यात तलासरी तालुक्यातील आच्छाड हद्दीत रस्त्याचे काँक्रीटीकरण काम सुरू आहे. या ठिकाणी दुचाकी काँक्रिटमध्ये रुतल्यामुळे दुचाकीस्वाराची दुचाकी काढण्यासाठी सुरू असलेली धडपड कॅमेऱ्यात कैद झाली. आवश्यक सूचना फलक, सुरक्षा उपाययोजनांचा अभाव असल्यामुळे अनेक वेळा चालकांची… pic.twitter.com/rvfrdHiqUQ
— LoksattaLive (@LoksattaLive) April 2, 2025
महामार्गावर मनोर, चील्हार फाटा, मेंढवण, तवा, चारोटी, विवळवेढे, धानीवरी, आंबोली, हळद पाडा, दापचारी, तलासरी, सुत्रकार, सावरोली, आमगाव, आच्छाड भागात मुख्य रस्त्यांसह सेवा रस्त्यांवर अनेक ठिकाणी काँक्रिट रस्त्यांची दुरवस्था झाली असून यातील अधिकाधिक खड्डे ओल्या काँक्रिट वर वाहने चाढवल्यामुळे झाल्याचे दिसून येते. याविषयी महामार्ग प्रशासनाशी संपर्क केला असता ओल्या काँक्रिटवर वाहने चढवल्यामुळे होणारे खड्डे बुजवण्याची सूचना महामार्गावर काम करणाऱ्या कंत्राटदाराला देण्यात आली असून असे प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना देण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प प्रबंधक सुमित कुमार यांनी दिली.