पालघर : मुंबई बडोदा द्रुतगती मार्गाच्या जमीन अधिग्रहण प्रकरणात बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन जमिनीचा मोबदला मिळवल्या प्रकरणात अटकेत असणारा राहुल सोनार (३२) या आरोपीने आज सायंकाळी पालघर पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांना गाफील ठेवून पलायन केले. पोलिसांना ही बाब समजल्यानंतर पळालेल्या आरोपीचा सर्वत्र शोध सुरू करण्यात आला आहे. जमीन अधिग्रहण प्रकरणात बनावट ओळखपत्र, आधार कार्ड यांचा वापर करून बँकेत जमा झालेली रक्कम हडप केल्या प्रकरणात पालघर पोलिसांमध्ये सहा महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात राहुल सोनार याला पालघर पोलिसांनी अटक केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : महामार्गाच्या काँक्रीटीकरण कामामुळे चारोटीजवळ वाहतूक कोंडी, पाच ते सहा किमी वाहनांच्या रांगा

वैद्यकीय तपासणीनंतर लघुशंकाला जातो अशी सबब पुढे करून आरोपी ठाणे अंमलदार यांच्या कक्षामध्ये काही काळ बसून राहिला होता. दरम्यान पालघर येथे जनसंवाद अभियान अंतर्गत बक्षीस वितरण सोहळा पालकमंत्री यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असल्याने वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी त्या ठिकाणी कार्यरत होते. याचवेळी पोलीस स्टेशन मधील पोलीस कर्मचारी अन्य एका आरोपीला कोठडीमध्ये रवानगी करत असताना राहुल सोनार हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन अलगदपणे निसटला. ही बाब सुमारे ५-१० मिनिटांनंतर पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलीस स्टेशन मधील कर्मचारी उपलब्ध असणाऱ्या वाहनांच्या मदतीने शोध कार्यासाठी रवाना झाले. यापूर्वी देखील पोलीस स्टेशन मधील छतामध्ये छिद्र पाडून काही वर्षांपूर्वी आरोपी फरार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात फरार झालेल्या आरोपीचा शोध पालघर पोलीस घेत आहेत.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In palghar accused absconded from palghar police station css