पालघर : बियर दुकानाच्या परवान्यासाठी लाच मागणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षकाविरोधात पालघर लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीचे नावे बियर दुकानाचा परवाना मिळवण्यासाठी जानेवारी २०२३ मध्ये पालघर येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात अर्ज दिला होता. राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात दुय्यम निरीक्षक पदावर असलेल्या नितीन बाबू संखे यांनी तक्रादाराने दिलेल्या अर्जावर कार्यवाही करून त्यांना बियर दुकानाचा परवाना देण्याकरीता तक्रारदार यांच्याकडे चार लाख रुपये लाचेची मागणी केली होती. मात्र तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याविरोधात २० नोव्हेंबर रोजी पालघर लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती.
हेही वाचा : अवकाळी पावसाचा वाडा तालुक्याला फटका, १५८९ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी १४९ लक्ष रुपयांचे नुकसान
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत विभागाने पडताळणी केली असता तक्रारीत तथ्य असल्याचे आढळले. दुय्यम निरीक्षक नितीन संखे यांनी तक्रारदाराने दिलेल्या अर्जावर कार्यवाही करून त्यांना बिअर दुकानाचा परवाना देण्याकरिता प्रथम चार लाख आणि त्यानंतर तडजोड करून तीन लाख चाळीस हजार रुपये लाच म्हणून स्वीकारण्याचे मान्य केले असल्याने त्यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती लाचलुचपत विभागाने दिली आहे.