पालघर : गेल्या अनेक वर्षांपासून वृद्धाश्रमात आपले जीवन जगणाऱ्या आजी आजोबांना लग्न सोहळ्याचा आनंद मिळावा तसेच लग्नाच्या प्रक्रियेत त्यांना सहभागी होता व्हावे या दृष्टिकोनातून पालघर येथील आनंदाश्रम वृद्धाश्रमाने आज चार जोडप्यांच्या सामुदायिक विवाहाचे आयोजन केले होते. या लग्न सोहळ्याच्या पूर्वतयारी पासून मंगलाष्टके, गाणी, कन्यादान करणे व नव दाम्पत्यांबरोबर नाच गाणे करण्यात वयस्करांनी सक्रियपणे सहभाग घेतला.
पालघर तालुक्यातील शिरगाव (चुनाभट्टी) येथे गेल्या १८ वर्षांपासून आनंदाश्रम वृद्धाश्रम कार्यरत असून सध्या या ठिकाणी ४५ आजी-आजोबा वास्तव्य करीत आहेत. या आजी-आजोबांना लग्न सोहळ्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होता यावे व या एकंदर सोहळ्याचा आनंद लुटता यावा यासाठी वृद्धाश्रम व्यवस्थापनाने इनरव्हील क्लब ऑफ एअरपोर्ट (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने चार जोडप्यांचा सामुदायिक विवाह वृद्धाश्रमाच्या पटांगणात आयोजित केला होता.
लग्न सोहळ्याच्या निमित्ताने सजावट व उर्वरित तयारी करण्यास आजी व आजोबांनी गेल्या दोन दिवसांपासून तयारीची लगबग सुरू केली होती. सर्व वृद्धाश्रमवासी आज ठेवणीतले आकर्षक कपडे परिधान करून लग्नासाठी सज्ज झाले होते. वऱ्हाडी मंडळींचे स्वागत करणे, लग्न लागताना प्रत्यक्ष मंगलाष्टक गाणे, कन्यादान करणे तसेच नवदाम्पत्यांबरोबर नाचगाणे करून आनंद व्यक्त करण्यात या ज्येष्ठ नागरिकांनी कुठेही कमी ठेवली नाही.
हेही वाचा : डहाणू नगरपरिषद हद्दीत अग्निप्रतिबंधक उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी
उपस्थित वरवधूंच्या नातेवाईकांबरोबर सहभाग घेणे तसेच त्यांच्या विदाई प्रक्रियेत ही सर्व मंडळी सहभागी झाल्याचे दिसून आले. जीवनाच्या उतरत्या टप्प्यात आपल्या नातवंडांचा विवाह झाल्याप्रमाणे या ज्येष्ठांनी लग्न समारंभाचा आनंद लुटला. सेवाभावी संस्थेने नवदाम्पत्यांना आर्थिक मदत तसेच गृह उपयोगी वस्तूंची भेट दिली. या लग्न सोहळ्यानिमित्ताने झालेला आनंद पुढील जीवन जगण्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.