कासा: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचे काँक्रीटीकरण करण्याचे काम सध्या सुरू असल्याने महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. चारोटी टोल नाक्याच्या समोर मुंबईकडे जाणाऱ्या दोन मार्गिकेवर काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होऊन दापचरी ते तवा या दहा ते बारा किमी संपूर्ण मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

दापचरी ते तवा हे अंतर जाण्यासाठी वाहतूक कोंडीमुळे वाहनांना आज दोन ते अडीच तास इतका वेळ लागत होता. बरेच वाहने उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी झाल्याने सेवा रस्त्याचा वापर करीत आहेत. त्यामुळे नाशिक डहाणू राज्य मार्गावरही सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

मेंढवन खिंड, चिल्लार फाटा याही ठिकाणी काँक्रीटीकरण सुरू असल्याने त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहे. गुजरातकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक वाहनांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. तलासरी ते घोडबंदर दरम्यान च्या प्रवासाला साधारणपणे दीड ते पावणेदोन तास वेळ लागत होता परंतू काँक्रीटीकरण सुरू झाल्यापासून याच प्रवासाला तीन ते साडेतीन तास वेळ लागत आहे.

हेही वाचा : डहाणू-जव्हार मार्गाची दुरवस्था; खड्डे, चिखलामुळे वाहनचालक त्रस्त, तातडीने कार्यवाहीची मागणी

तलासरी ते घोडबंदर दरम्यान दोन टोल नाके आहेत या दोन्ही ठिकाणी टोल वसूल केला जातो. महामार्गाच्या काँक्रीटीकरण सुरू असल्याने टोल भरूनही वाहनचालकांना वाहतूक कोंडी मध्ये अडकून पडावे लागते तसेच जास्तीचे इंधनही खर्च होते. त्यामुळे जोपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होत नाही,तोपर्यंत टोल वसुली बंद करावी अशी मागणी अनेक वाहनचालक करत आहेत. तलासरी,चारोटी या ठिकाणावरून अनेक नागरिक महामार्गावरून प्रवास करून वसई, विरार, ठाणे, बोरिवली या ठिकाणी दररोज कामानिमित्त प्रवास करतात. परंतु वाहतूक कोंडी होत असल्याने महामार्गावरून प्रवास करणे कठीण झाले आहे. महामार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याने अनेक नागरिकांनी महामार्गावरून प्रवास करणे टाळून रेल्वेने प्रवास करण्यास सुरुवात केली आहे. चारोटी उड्डाणपुलाखालून नाशिक डहाणू राज्यमार्ग जातो. डहाणू तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी डहाणू येथे शिक्षणासाठी जातात, तसेच अनेक नागरिक सुद्धा कामानिमित्त डहाणू या ठिकाणी जातात. परंतू चारोटी उड्डाणपुलाखालीही वाहतूक कोंडी होत असल्याने डहाणू कडे जाणाऱ्या येणाऱ्या नागरिक विद्यार्थी यांनाही या वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे.

हेही वाचा : मुंबई : १५ डबा लोकलच्या २०९ फेऱ्या, पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात आजपासून बदल

वाहतूक कोंडी होऊनही टोल वसुली सुरूच

महामार्गावरून प्रवास करताना प्रवास जलदगतीने व्हावा, इंधन वाचावे यासाठी टोल घेतला जातो. परंतु महामार्गावर ठिकठिकाणी काम सुरू असल्याने, वाहतूक कोंडी होत आहे. तसेच दोन ते अडीच तास वाहतूक कोंडी मुळे अतिरिक्त वेळ, अतिरिक्त इंधनही खर्च होत आहे. त्यामुळे जोपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल वसुली करू नये अशी मागणी वाहनचालक करत आहेत.