बोईसर : येथे गुढीपाडव्यानिमित्त लावलेल्या मनसेच्या बॅनर वरील अविनाश जाधव यांचा फोटो विद्रूप करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पालघर जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत वादातून पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचा फोटो विद्रूप करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

गुढीपाडव्याच्या सणानिमित्त बोईसर परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे फोटो असून खैरापाडा उड्डाणपूल, मुकुट टॅंक पेट्रोल पंप आणि ओसवाल एम्पायर या तीन ठिकाणी लावलेल्या बॅनर वरील मनसेचे नेते व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचा फोटोवर पांढऱ्या रंगाची फवारणी करून फोटो विद्रूप करण्यात आल्याचे रविवारी दुपारी समोर आले. मनसेच्या बॅनर वरील अविनाश जाधव यांचा फोटो विद्रुप केल्याचे बोईसर पोलीस स्टेशनला कळविण्यात आल्यानंतर तातडीने हे बॅनर काढून टाकण्यात आले. मात्र या निमित्ताने पालघर जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात सुरू असलेली अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.

अविनाश जाधव यांच्यावर असलेल्या नाराजीतून बॅनर वरील फोटो विद्रूप करण्याचा प्रयत्न ?

विधानसभा निवडणुकीत पालघर जिल्ह्यातील मनसेच्या उमेदवारांना अपेक्षित अर्थसहाय्य मिळाले नसल्याची तक्रार पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे केल्यामुळे आपली बदनामी झाली या रागातून डिसेंबर महिन्यात अविनाश जाधव व त्यांच्यासोबत असलेल्या १० ते १२ जणांनी पाम येथील कार्यालयात मनसेचे पालघर लोकसभा जिल्हाध्यक्ष समीर मोरे व इतर कार्यकर्त्यांवर  हल्ला करून मारहाण केल्याची घटना घडली  होती. जिल्ह्यातील मनसेचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते याना झालेल्या मारहाण प्रकरणी अविनाश जाधव व त्यांच्या कार्यकर्त्यांवर सातपाटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.  या प्रकरणी मारहाण करण्याचा आरोप असलेले अविनाश जाधव यांच्यावर पक्षाकडून कोणतीही कारवाई न करता उलट त्यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याने नाराज होऊन लोकसभा जिल्हाध्यक्ष समीर मोरे आणि त्यांच्या सोबत इतर कार्यकर्त्यानी मनसेला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा हाती घेतला होता. तर काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानंतर समीर मोरे यांची पालघर विधानसभा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र मनसे सोडून शिवसेनेत प्रवेश केलेल्या इतर कार्यकर्त्यांना आश्वासन दिल्याप्रमाणे पदे न मिळाल्याने समीर मोरे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश केलेल्या बहुतेक सर्व मनसैनिक अवघ्या दोन महिन्यातच शिवसेना सोडून गेल्या आठवड्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा मनसेत परतले. जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व मनसैनिकांवर हल्ला करून मारहाण केल्यानंतर देखील त्यांच्यावर वरिष्ठांकडून पक्षांतर्गत कारवाई न झाल्याने तसेच बोईसर मध्ये बॅनरवर त्यांचे फोटो झळकल्याने नाराज कार्यकर्त्यांकडून त्यांचा फोटो विद्रूप करण्याचा प्रयत्न केला गेला असल्याची चर्चा सुरू आहे.