पालघर: मासेमारी करताना भारताची हद्द ओलांडून पाकिस्तान हद्दीमध्ये प्रवेश केल्याच्या आरोपाखाली अटकेत असणाऱ्या डहाणू तालुक्यातील विनोद लक्ष्मण कोल (४५) याचा १७ मार्च रोजी तुरुंगवास भोगताना पाकिस्तानात मृत्यू झाला. त्याचा मृतदेह सव्वा महिन्यानंतर २९ एप्रिल रोजी भारतात पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे पाकिस्तानात कैदेत असणाऱ्या भारतीय खलाशांच्या यातना मृत्यूनंतरदेखील सुरू असल्याचे दिसून आले आहे.
गुजरात राज्यातील बोटीवर ऑगस्ट २०२२ मध्ये काम करणासाठी गेलेल्या विनोद लक्ष्मण कोल यांना सुमारे दीड वर्षांपूर्वी इतर खलाशांसह पाकिस्तान तटरक्षक दलाने ताब्यात घेऊन त्याची तुरुंगात रवानगी केली होती. ८ मार्च रोजी हा खलाशी स्नानगृहात असताना त्याला अर्धांगवायूचा झटका आल्याने तो तिकडेच कोसळून पडला. त्याला पाकिस्तान येथील रुग्णालयात दाखल केल्यानंतर १७ मार्च रोजी मृत्यू झाल्याचे त्याच्यासोबत असणाऱ्या सहकारी खलाशांना सांगण्यात आले.
हेही वाचा : मनसेच्या मतांच्या जोरावर महायुतीचा उमेदवार पालघरमधून विजयी होणार- अविनाश जाधव
पाकिस्तान तुरुंगात असणाऱ्या खलाशांनी विनोद कोलच्या आजारपणाची तसेच नंतर त्याचा मृत्यू झाल्याची माहिती चिट्ठीद्वारे तुरुंगातील महितीगारांमार्फत बोर्डी जवळील अस्वली येथे राहणाऱ्या त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली. मात्र त्याचा मृतदेह अंत्यविधीसाठी उपलब्ध होईल अथवा नाही याबाबत नातेवाईक साशंक राहिले. या मृत्यूबाबतची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधींना त्यांच्या नातेवाईकांनी दिली होती. भारत सरकारने पाठपुरावा करून २९ एप्रिल रोजी मृतदेह भारतात आणला जाईल अशी माहिती पत्रकार व शांतीवादी कार्यकर्ते जतिन देसाई यांनी लोकसत्तेला दिली.
विशेष म्हणजे सामान्य कैदी असणाऱ्या या खलाशाचे राष्ट्रीयत्व निश्चित झाल्यानंतर देखील मृतदेहाच्या हस्तांतरणासाठी महिनाभरापेक्षा अधिक काळ लागल्याने मृतदेहाची कुजण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची शक्यता आहे. शिवाय अमृतसर येथे हा मृतदेह भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिल्यानंतर त्याला थेट मुंबई अथवा सुरत येथे न आणता प्रथम हा मृतदेह वेरावळ येथे नेऊन नंतर अंत्यविधीसाठी डहाणू तालुक्यातील अस्वली खुनवडे ग्रुप ग्रामपंचायत मधील गोरातपाडा येथील त्यांच्या घरी आणण्यात येणार आहे. राज्य सरकारने हा मृतदेह अमृतसर येथून थेट मुंबईपर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करावे अशी अपेक्षा मृताचे सावत्र भाऊ गणपत बुजड यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा : पालघर: शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात भूगोल उद्यानाची स्थापना, राज्यातील चौथा प्रकल्प
भारतातील एक खलाशी पाकिस्तान तुरुंगात मृत पावल्याची माहिती केंद्र सरकारकडे उपलब्ध झाली होती. मात्र त्याचे नाव विनोद लक्ष्मण इतकेच प्राप्त झाल्याने तो गुजरात राज्यातील नवसारी भागातला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. महाराष्ट्रातील पाक कैदेत असणाऱ्या सुमारे ३० खलाशांची यादी पडताळली असता मृत खलाशी हा डहाणू तालुक्यातल्या असल्याचे स्पष्ट झाल्याचे जतिन देसाई यांनी सांगितले.
हेही वाचा : सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांना निवडणुकीनंतर पारिवारिक सुख उपभोगता येईल- डॉ. दिनेश शर्मा
कुटुंब पडले उघड्यावर
पाकिस्तानात तुरुंगवास भोगताना मृत्यू ओढवलेल्या विनोदला पत्नीसह अविवाहित असणारी दोन मुलं, दोन मुली तसेच एक विवाहित मुलगी असा परिवार आहे. मृताच्या आधार कार्डावर त्याचे वय ५७ वर्ष असल्याचे नमूद असले तरी प्रत्यक्षात तो ४६ वर्षांचा असल्याचे त्याच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. विनोदच्या मृत्यूमुळे त्याचे कुटुंब उघड्यावर पडले असून बोट मालक तसेच राज्य व केंद्र सरकारने मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.