पालघर : डहाणू तालुक्यातील पावन येथील डूकले कुटुंबातील तीन मुलांची प्रकृती १९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी खराब झाली असून यातील दोघांचा मृत्यू झाला असून एका मुलाची प्रकृती सध्या स्थिर आहे. जेवणातून विषबाधा झाल्यामुळे मुलांची प्रकृती खालावल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून शव विच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.
पावन येथे राहणाऱ्या डूकले कुटुंबाचे घर म्हणजे एक छोटीशी झोपडी असून यामध्ये विद्युत सुविधा देखील उपलब्ध नाही. रक्षाबंधनाच्या दिवशी कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर ७ वाजता दरम्यान कुटुंब दिव्याच्या उजेडात जेवण करून झोपले होते. दरम्यान ८.३० वाजताच्या दरम्यान नरेश डूकले यांच्या दीपक वय ९, विशाल वय ७ आणि सूरज वय ३ वर्ष या तीनही मुलांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. रात्री उशिरा पर्यंत मुलांचा त्रास कमी झाला नसून मध्यरात्रीच्या सुमारास मुलांना खूप जास्त प्रमाणात त्रास सुरू झाला होता. यामुळे नरेश आणि त्यांच्या पत्नीने आपल्या आप्तेष्टांना मदतीने रात्री २ वाजताच्या सुमारास मुलांना उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जात असताना विशाल याचा घरीच मृत्यू झाला असून दीपक आणि सूरज यांना कासा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. येथे मुलांवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नजीकच्या केंद्रशासित प्रदेशातील सेलवास येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. रुग्णालयात नेत असतानाच दीपक डूकले याचा दुर्दैवी मृत्यु झाला असून तीन वर्षीय सूरजची प्रकृती सध्या स्थिर आहे.
हेही वाचा : वाढवण बंदर देशातील सर्वोत्तम बंदर बनणार; केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल
एकाच दिवसात कुटुंबातील दोन मुलांचा मृत्यू झाल्यामुळे डूकले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. चिमुकल्यांचा मृत्यूचे नेमके कारण काय असावे याची चर्चा सध्या परिसरात सुरू असून घरात विद्युत व्यवस्था नसल्यामुळे जेवण बनवताना त्यामध्ये काही तरी पडले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे मुलांना जेवणातून विषबाधा झाल्यामुळे वेळीच उपचार न मिळाल्यामुळे चिमुकल्यांना जीवाला मुकावे लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चिमुकल्या विशालच्या मृतदेहाचे शवविच्छेदन कासा उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले असून दीपकचे शव विच्छेदन सेलवास येथील रुग्णालयात करण्यात आले आहे. दोघांचाही शवविच्छेदन अहवाल अजूनही समोर आला नसून अहवाल मिळाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येणार असल्याचे सांगितले जात आहे.
रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी पहाटे मुलांना उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनतर दुसऱ्या दिवशी नरेश डूकले यांना देखील उलटी आणि ताप सारखे त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना २१ ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे कुटुंबीयांची प्रकृती बिघडण्यामागे जेवणातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून शव विच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर मुख्य कारण समोर येणार असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा : ‘लाडक्या बहिणीं’ची संवेदनशील माहिती ‘व्हायरल’
प्रथम रुग्णालयात आलेल्या दोनही मुलांना होणारा त्रास एकसमान असून दुसऱ्या दिवशी त्यांच्या वडिलांना देखील तसाच त्रास होत असल्यामुळे त्यांनाही दाखल करण्यात आले होते. त्यामुळे कुटुंबाला जेवणातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृतांचे शव विच्छेदनाचे अहवाल मिळाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.
डॉ. सुनील वाघमारे, वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय कासा