वाडा : गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांकडे असलेले पशुधन हे वाढण्याऐवजी त्यात कमालीची घट होऊ लागल्याने भविष्यात येथील शेतीमध्ये सेंद्रिय खताचा अभाव तर दिसून येईलच, पण गावोगावी मिळणाऱ्या गायी, म्हशीच्या दुधा ऐवजी अन्य देशांतून आयात होणाऱ्या दुधाच्या पावडरचे प्रमाण वाढीस लागेल. पशुधन कमी होणे हे शेतकऱ्यांबरोबर सर्वांसाठी चिंतेची बाब ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशाची आर्थिक राजधानी व जागतिक बाजारपेठ असलेल्या मुंबई शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी कोटीच्या संख्येत पशुधन होते. या जिल्ह्यातून दररोज लाखो लिटर दूध मुंबई बाजारपेठेत जात होते. तर या जिल्ह्यातील संपुर्ण शेतीमध्ये येथील पशुपासुन मिळणाऱ्या शेणखताचा वापर केला जात होता. या जिल्ह्यातील वाडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पिकवला जाणारा वाडा कोलम सेंद्रिय खतामुळेच नावारूपाला आला होता.

हेही वाचा : तारापूर औद्योगिक क्षेत्राला जोडणार्‍या मुख्य रस्त्यांवर स्वयंचलित सिग्नल यंत्रणा

दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते. पालघर जिल्ह्यात करण्यात आलेल्या सन २०१२-१३ च्या पशुगणनेमध्ये तीन लाख ९६ हजार पशुधन (गाय, बैल, म्हैस, रेडा) होते. त्यानंतर सन १०१७-१८ मध्ये करण्यात आलेल्या पशुगणनेमध्ये ही संख्या तीन लाख ८६३७ पर्यंत आली. म्हणजेच पाच वर्षांत ८७ हजारांहून अधिक पशुधन घटले आहे. सन २०२२-२३ ची पशुगणना पुर्ण झालेली नाही, मात्र या पशुगणनेमध्ये पशुधनाची कमालीची संख्या कमी झाली असुन हा चिंतेचा विषय बनला आहे.

९८ टक्के गायरानावर अतिक्रमण

ब्रिटिश राजवटीत महसुल गावांची निर्मीती करताना संबंधित गावाच्या एकुण क्षेत्रापैकी १० टक्के क्षेत्र हे गायरान (गुरचरण) क्षेत्र ठेवण्यात आले होते. या राखीव क्षेत्रावर गेल्या ७५ वर्षांत अतिक्रमण होऊन ते फक्त दोन टक्के शिल्लक राहिले आहे. अनेक गावांमध्ये नव्याने वाढत असलेल्या वस्त्यांसाठी गावठाण उपलब्ध होत नसल्याने गावालगतच्या गायरान जमीनीवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेले दिसून येत आहे.

हेही वाचा : पालघर : भ्रष्टाचार प्रकरणामधे जव्हारच्या तीन कार्यकारी अभियंत्यांसह एकूण सात अधिकाऱ्यांवर शासनाची कारवाई

शहरीकरण वाढले

शहरीकरणामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने तसेच चराऊ क्षेत्रात घट झाल्याने अनेकांनी पशुधन सांभाळणे बंद केले. शेतीमध्ये यांत्रिकीकरण वाढल्याने व पशुधन सांभाळण्याचा खर्च वाढल्याने अनेक शेतकऱ्यांनी पशुधन कमी केले आहे. “बैलगाडी, लाकडी नांगर हे कालबाह्य ठरल्याने तसेच नोकरी, व्यवसायाकडे लोकांचा कल वाढल्याने पशुधनाची संख्या कमी होऊ लागली आहे.” – डॉ. प्रकाश हसनालकर, जिल्हा पशुधन अधिकारी, जिल्हा परिषद पालघर

हेही वाचा : बोईसर : प्रदूषणकारी आरे ड्रग्स कारखान्यावर उत्पादन बंदीची कारवाई

“दुधाळ जनावरांच्या वाढलेल्या किंमती व वाढलेले खाद्याचे दर यामुळे दुधाचा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर राहिलेला नाही. यामुळे दुधाळ जनावरांची संख्या कमी झाली.” – लक्ष्मण पाटील, शेतकरी, शिलोत्तर, ता. वाडा.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In palghar district at wada livestock declining by 25 percent for every five years css