बोईसर : मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गाच्या कामात करण्यात आलेल्या भुसुरुंग स्फोटांमुळे राहत्या घरांना भेगा पडल्याचा आरोप आदिवासी कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार देऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन च्या उन्नत मार्गाचे काम पालघर जिल्ह्यातील वसई, पालघर, डहाणू आणि तलासरी तालुक्यात युद्ध पातळीवर सुरू आहे. बुलेट ट्रेन मार्गाचे खांब उभारण्यासाठी यंत्राच्या सहाय्याने जमिनीमध्ये ३० ते ४० फूट खोल खड्डे खोदण्यात येत असून खोदकामादरम्यान लागणारे दगड फोडण्यासाठी भुसुरंग स्फोट केले जात आहेत. बुलेट ट्रेन मार्गातील खांबांच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यातील दगड फोडण्यासाठी रात्रीच्या सुमारास करण्यात आलेल्या जोरदार भुसुरुंग स्फोटांमुळे जमिनीला हादरे बसून गोवणे ग्रामपंचायत हद्दीतील वायेडा पाडा, गावठाण पाडा या आदिवासी पाड्यातील जवळपास दहा ते बारा घरांच्या भिंतीना ठिकठिकाणी तडे गेल्याचा आरोप या ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबीयांनी केला आहे.

बुलेट ट्रेन मार्गासाठी करण्यात येणाऱ्या भुसुरुंग स्फोटांमुळे भिंतींना तडे गेल्यामुळे घरे राहण्यासाठी धोकादायक झाली आहेत. याबाबत बुलेट ट्रेन मार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर त्यांनी तडे केलेल्या घरांची पाहणी करून नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दोन आठवड्यानंतर देखील नुकसान भरपाई देण्याबाबत दुर्लक्ष केल्याने नुकसानग्रस्त कुटुंबे हवालदिल झाले असून त्यांनी नुकसान भरपाई मिळावी यासाठी पालघरचे जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित शासकीय विभागांकडे धाव घेतली आहे.

पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय प्रकल्पांच्या कामादरम्यान डोंगर टेकड्या फोडण्यासाठी करण्यात येत असलेल्या भुसुरंग स्फोटांमुळे या आधी सुद्धा स्थानिक नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे प्रकार घडले आहेत. मुंबई बडोदा द्रुत्तगती महामार्गात अडथळा ठरणाऱ्या टेकड्या फोडण्यासाठी करण्यात आलेल्या जोरदार भूसुरंग स्फोटामुळे जमिनीला हादरे बसून किराट आणि गंजाड जवळील नवनाथ गावातील घरांना मोठ्या प्रमाणात तडे गेले होते तसेच स्फोटामुळे दगड उडून स्थानिक नागरिकांच्या घरांवरील पत्रे आणि कौले फुटून नुकसान झाले होते. या प्रकरणी पीडित कुटुंबीयांना ठेकेदार कंपनीमार्फत नुकसान भरपाई देण्यात आली होती.

बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या मार्गातील दगड फोडण्यासाठी भुसुरुंग स्फोट केले जात असून यामुळे जमिनीला हादरे बसून माझ्या घरासह गोवणे गावातील आणखी दहा ते बारा घरांना ठिकठिकाणी तडे जाऊन घरे राहण्यासाठी धोकादायक बनली आहेत. याप्रकरणी नुकसान भरपाई मिळण्यासाठी आम्ही पालघर चे जिल्हाधिकारी आणि इतर विभागांकडे तक्रार दाखल केली आहे. – बारक्या वायेडा, तक्रारदार ग्रामस्थ, गोवणे

बुलेट ट्रेन मार्गासाठी करण्यात येत असलेल्या भुसुरुंग स्फोटांमुळे गोवणे गावातील दहा ते बारा घरांचे नुकसान झाल्याची तक्रार प्राप्त झाली असून या प्रकरणी स्थळपाहणी व पंचनामा करून अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यात येणार आहे. – रसिका पाटील, तलाठी