पालघर : पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात गुढीपाडव्यानंतर चैत्र महिन्यात जत्रेला सुरुवात होत असून एक दिवसीय उत्सव ते १५ दिवसांपर्यंत चालणाऱ्या जत्रांकरिता नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असते. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणार्या जत्रांचे ग्रामीण भागात मोठे अप्रूप आहे. डहाणू येथील श्री महालक्ष्मीची जत्रा व सातपाटी येथील रामनवमीची जत्रा या दोन महत्त्वाच्या जत्रा मानल्या जात असून यासह जिल्ह्यातल्या इतर जत्रांमुळे एकोपा दिसून येतो.
होळी उत्सव संपला की सर्वांना ओढ असते चैत्र महिन्याची. ३० मार्च गुढीपाडव्यापासून जत्रांना सुरुवात होत असल्याने बच्चेकंपनी पासून अबाल वृद्धांपर्यंत सर्वांमध्ये जत्रेकरिता उत्साह दिसून येत असतो. महाशिवरात्रीपासून काही गावांमध्ये जत्रोत्सवाला प्रारंभ झाला असून गुढीपाडवा, रामनवमी व हनुमान जयंती निमित्त जिल्ह्याच्या विविध भागात जत्रांचा महोत्सव सुरू होतो. पालघर जिल्ह्यासह ग्रामीण भागात असलेल्या प्रसिद्ध ग्रामदेवता तसेच इतर देवस्थानांमध्ये जत्राची लगबग सुरू आहे.
मराठी नववर्षाला गुढीपाडव्यानिमित्त जिल्ह्यातील विविध ठिकाणी शोभायात्रा काढण्यात येते. जत्रेदरम्यान रोषणाई, मिठाई, खेळणी, शोभेच्या वस्तू, गृहोपयोगी वस्तू, सजावटीच्या वस्तू, कलाकुसरीच्या वस्तू, विविध पाळणे आदींनी मंदिराच्या आवारातील परिसर मंगलमय वातावरणाने फुललेला असतो.
रामनवमीपासून तीन दिवस सातपाटी येथे तसेच हनुमान जयंती पासून १५ दिवस डहाणू येथील श्री महालक्ष्मीची जत्रा असते. या जिल्ह्यातील मोठ्या जत्रा असल्याने जत्रेकरिता गुजरात, मुंबई, ठाणे, पालघर येथून लाखो भावीक येत असतात. विविध जाती धर्माचे बांधव सहभागी होऊन जत्रोत्सवाचा आनंद लुटताना दिसतात. जत्रेला येणाऱ्या भाविकांच्या अनुषंगाने सोयी सुविधा, कायदा व सुव्यवस्था चोख राहावी तसेच गर्दीचा फायदा घेऊन गैरवर्तन व चोरी करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असते.
जत्रेदरम्यान अनेकांना रोजगाराची संधी
जत्रेच्या काळात लाखोंची उलाढाल होत असून खेळण्या-पाळण्यांपासून ते प्रसादांच्या दुकानापर्यंत, मंदिरातील पुजाऱ्यांपासून ते फूलविक्रेता यांना रोजगार मिळून चार पैसे मिळतात. जत्रांचा मौसम सुरू झाला की महिला वर्ग घरगुती बनवलेल्या पदार्थांची दुकाने जत्रेदरम्यान मांडतात. तसेच कलाकुसरीच्या वस्तू, वेगवेगळ्या खाद्यपदार्थांच्या गाड्या, मोठमोठाले पाळणे, चालाखीचे खेळ तसेच इतर घरगुती वस्तूंच्या दुकानामुळे जत्रेच्या काळात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते आणि स्थानिकांना रोजगार देखील मिळतो.
ग्रामीण भागात जत्रांचे महिने महत्त्वाचे
एकदा का मृगाची सुरुवात झाली की गावगाड्यातील शेतकरी मशागतीच्या कामाला लागतात. खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांना यात्रा-जत्रा हाच एक ऊर्जेचा स्त्रोत असल्याचे पाहायला मिळते.
यात्रेनिमित्त पै-पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळी येत असतात. यामधून वाहतूक व्यवस्थेचा खर्च चांगला चालतो. येणाऱ्या नातेवाइकांना शाकाहारी, मांसाहारी जेवण असले की मांस विकत घेण्यापासून किराणा दुकानातील खरेदी-विक्री वाढते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने थंड पेये, शेतकऱ्यांकडील दूध, उसाचा रस व कलिंगडे, भाजीपाला यांचीही विक्री होते. यामुळेच यात्रा-जत्रांच्या निमित्ताने वर्षभरातील मिळकत या एक दोन महिन्यांत होते.
बच्चे कंपनीला प्रतीक्षा जत्रांची
बच्चेकंपनीसाठी तर जत्रा म्हणजे पर्वणीच असते. काही शाळांच्या परीक्षा संपल्या असल्याने तर काही परीक्षा संपत आल्या असल्याने मुलांना जत्रांची ओढ असते. जत्रेत मांडलेल्या विविध दुकानांमुळे मुलांना आकर्षण होत असल्याने खेळणीसह इतर वस्तू घेण्याकरिता लहान मुलांची लगबग पाहायला मिळते.
काळानुसार बदल
पूर्वी करमणुकीची साधने नव्हती तेव्हा जत्रेत महाराष्ट्राची लोककला अर्थात तमाशाचा फडही रंगत असे. विविध नामवंत कलाकार या ठिकाणी आपली कला सादर करीत असत, मात्र अलीकडच्या काळात तमाशाची जागा डान्स पार्टीने घेतली. पूर्वी विजेच्या दिव्यांची सुविधा नव्हती तेव्हा जत्रा दिवसा भरायची. आता दिव्यांचा झगमगाट रात्री उशीरापर्यंत जत्रेत सुरु असतो. मानवी ताकदीवर फिरणारया पाळण्याची जागा आता मोठमोठाल्या इलेक्ट्रीक पाळण्यांनी घेतली आहे.
जिल्ह्यातील जत्रेची ठिकाणे :
गुढीपाडवा : माहीम, चिंचणी
श्रीराम नवमी : सातपाटी येथील श्रीराम मंदिर (तीन दिवस), माहीम, आगरवाडी, एडवण व नरपड येथील श्री साईबाबा मंदिर (एक दिवसीय)
हनुमान जयंती : डहाणू येथील श्रीमहालक्ष्मी माता मंदिर (१५ दिवस), केळवे येथील (श्रीशितलादेवी मंदिर), सफाळे येथील चटाळे, एडवण येथील (श्रीआशापुरी देवी मंदिर), वेढी येथील (श्रीहरबादेवी मंदिर), विवळवेढे येथील (श्रीमहालक्ष्मी माता मंदिर), माहीम येथील (श्री वेडूमाता मंदिर), दांडी येथील (श्री उच्छळा माता मंदिर), पालघर मधील नवली व नंडोरे, दातीवरे व कोरे येथे हनुमान जयंती निमित्त जत्रा भरतात.