पालघर : डहाणू आणि पालघर तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने बांधण्यात आलेल्या सूर्या प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्रात सातत्याने घट सुरू आहे. सिंचनापेक्षा बिगर सिंचनाला अधिक प्राधान्य देण्यात येत असल्याने शेती क्षेत्रात हळूहळू घट होत असून धरण बांधण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डहाणू आणि पालघर तालुक्यातील शेती ओलिताखाली येऊन आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ त्यांचे जीवनमान उंचावले जावे फायदा यासाठी सूर्या प्रकल्प अंतर्गत धामणी आणि कवडास उन्नेयी अशी दोन धरणे बांधण्यात आली. यातील मुख्य धामणी धरणातून कावडास बंधाऱ्यात पाणी सोडले जाऊन त्यातून उजवा तीर कालवा २८.१९ किमी लांबी व डावा तीर कालवा ३३ किमी असे कालवे तयार करून शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवण्याचे योजण्यात आले. सद्यस्थितीत हे कालवे आणि लघुपाट वितरीका यांची प्रचंड दुरवस्था झाली असून कालवे ठिकठिकाणी नादुरुस्त झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात गळती होऊन शेतकऱ्यांपर्यंत अपेक्षित पाणी पुरवठा होत नाही. परीणामी सिंचन क्षेत्रात सातत्याने घट होत आहे.

हेही वाचा : ‘जेएनपीए’ची माहिती फसवी, संघर्ष समितीचा आरोप; प्रदूषण नियंत्रण विभागाच्या कारवाईकडे जनतेचे लक्ष

डहाणू नगरपरीषद, पालघर नगरपरीषद. तारापुर अणूऊर्जा प्रकल्प, बीएआरसी, तारापुर औद्योगिक वसाहत, अदानी औष्णिक वीज प्रकल्प, वसई विरार महानगरपालिका यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारी व खाजगी आस्थापना यांना सूर्या प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. यातून दरवर्षी जवळपास ५० कोटी रूपयांचा सिंचन आणि बिगर सिंचन कर पाटबंधारे विभागाकडे जमा होतो. मात्र जमा होणार्‍या एकूण कराच्या तुलनेत शेतीला पाणीपुरवठा करणार्‍या कालव्यांच्या दुरुस्तीवर नाममात्र खर्च करण्यात येत असल्याने या कालव्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.

पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाच्या सिंचन हंगामाला १५ डिसेंबर पासून सुरवात होणार असून १५ मे पर्यंत पाण्याचे आवर्तन सुरू राहणार आहे. एकूण १४६९६ हेक्टर सिंचनक्षमतेपैंकी १२४९० हेक्टर सिंचनक्षमता निर्माण झाल्याचा दावा जलसंपदा विभागामार्फत करण्यात येत असला तरी ३० ते ३५ वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या कालव्यांची कामे सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात क्षतीग्रस्त झाल्याचे दिसून येत आहेत. क्षतिग्रस्त झालेल्या कालव्यांमुळे सिंचनासाठी सोडण्यात येत असलेल्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असून परिणामी हळूहळू सिंचन क्षेत्रात घट होत आहे.

हेही वाचा : वृद्धाश्रमात आजी आजोबांनी घेतला लग्न समारंभाचा आनंद; पूर्वतयारी, मंगलाष्टके, कन्यादानात सक्रिय सहभाग

सूर्या प्रकल्पांतर्गत कवडास उन्नेयी बंधार्‍यापासून निघणार्‍या उजवा तीर कालव्याची लांबी २८.५१ किमी व डावा तीर कालव्याची लांबी ४७ किमी आहे. डावा तीर कालव्याचे काम हे मुख्य कालवा वितरणप्रणालीसह ३३ किमीवरील बोरशेती गावापर्यंत पर्यंत पूर्ण झालेले आहे. मात्र पुढील ३४ किमी ते ४७ किमी किराट ते मनोर गावापरपर्यंतचे काम वनजमीन संपादन अभावी अद्यापही अपूर्ण आहे. सूर्या प्रकल्प हा अतिपर्जन्याच्या प्रदेशात येत असून सरासरी वार्षिक पर्जन्यमान २४०० मिमी ते २६०० मिमी दरम्यान असते. या भागातील भौगोलिक परीस्थिती पाहता पावसाचे जास्त प्रमाण आणि कालव्यांवर मोठ्या प्रमाणात गवत, झाडे-झुडुपे तयार होत असल्याने कालव्यांची बांधकामे, अस्तरीकरण व माती कामे मोठ्या प्रमाणात क्षतीग्रस्त होऊन पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचे पालघर पाटबंधारे विभागाचे म्हणणे आहे. तसेच माती कामातील लघु वितरीकांचे काटछेद अतिपर्जन्याच्या प्रदेशात सुस्थितीत ठेवणे दुरापास्त ठरत असून मातीकामातील भरावाच्या झीज होण्यासोबतच पावसाळ्यात कालव्यात वाहून येणार्‍या गाळामुळे तसेच उगवणार्‍या मोठ्या प्रमाणातील गवतामुळे वितरण प्रणाली पूर्णत: सुस्थितीत नसल्याने निर्मित सिंचनक्षमता व प्रत्यक्ष सिंचन यात मोठ्या प्रमाणावर तफावत असल्याचे दिसून येते.

हेही वाचा : वाढवण बंदरचा चेंडू आता ‘जेएनपीए’च्या कोर्टात, संघर्ष समितीच्या मुद्द्यांना उत्तर देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

सूर्या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात पूर्वी शेतकरी भात पीकासोबतच भुईमुगाचे पीक देखील घ्यायचे. मात्र भातपीका सोबतच इतर पिके घेण्यास शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत फारसे प्रोत्साहन न मिळाल्याने शेतकरी फक्त भात शेतीवरच अवलंबून राहू लागला. पावसानंतर धरणाच्या पाण्यामुळे वर्षभर शेतजमिनीत ओलावा राहत असून पिकांमध्ये फेरबदल न करता फक्त भाताचे उत्पादन काढले जात असल्याने जमिनीची सुपीकता कमी होऊन त्या नापीक बनत चालल्या आहेत. त्यातच तरुण पिढीचे शेतीकडे होणारे दुर्लक्ष, मजुरांची कमतरता, वाढती मजुरी, बियाणे खते आणि किटकनाशक यांची भाववाढ, रोगराई आणि उत्पन्नपेक्षा खर्च अधिक यामुळे हळूहळू शेती कमी होत आहे. सूर्या उजवा तीर आणि डावा तीर कालवा क्षतीग्रस्त झाल्यामुळे पृच्छ भागातील गावांपर्यंत पाणी पोचत नसल्याने रब्बी हंगामात प्रत्यक्षात मात्र फक्त चार ते पाच हजार हेक्टर क्षेत्रफळावरच भात आणि इतर बागायती शेतीसाठी पाण्याचा वापर केला जात आहे.

हेही वाचा : डहाणू नगरपरिषद हद्दीत अग्निप्रतिबंधक उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी

“सन २०२३-२४ चा सिंचन हंगाम सुरू होण्यापूर्वी पालघर पाटबंधारे विभाग अंतर्गत सूर्या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील कालव्यांच्या दुरूस्ती आणि साफसफाईची कामे सुरू करण्यात आली आहेत. लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांच्या सिंचनपूर्व सभा ग्रामपंचायत स्तरावर घेण्यात येऊन अधिकार्‍यामार्फत त्यांच्या अडचणी समजून घेत त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्प, वांद्री मध्यम प्रकल्प आणि खांड बंधार्‍यातून कालव्यांऐवजी बंदीस्त वाहीनीद्वारे शेतीच्या सिंचनासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी १०० कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे पाठविण्यात आला आहे.” – योगेश पाटील, कार्यकारी अभियंता, पालघर पाटबंधारे विभाग मनोर

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In palghar district damaged canals has lowered land under irrigation css
Show comments