कासा : येथील वनविकास महामंडळाच्या नर्सरीमध्ये महामंडळ विभागाची वेगवेगळी कार्यालय असून या कार्यालयांची दुरवस्था झालेली आहे. कार्यालयाच्या इमारती जीर्ण झाल्याने त्या कधीही कोसळतील अशा स्थितीत आहेत. कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे.
कासा येथील वनविभागाच्या कार्यालयाचे बांधकाम हे १९७५ मध्ये करण्यात आले होते. त्यानंतर या इमारतीची कुठल्याही प्रकारची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे कार्यालयाच्या इमारती जीर्ण होऊन मोडकळीस आलेल्या आहेत. या जीर्ण इमारतीमध्येच वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना काम करावे लागत आहे. डहाणू तालुका भूकंपप्रवण क्षेत्रात येत असल्यामुळे भूकंपाचा धक्का बसल्यास या इमारती कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. तर इमारतींचा डागडुजी आणि नूतनीकरणासाठी वरिष्ठ स्तरावर वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील निधीअभावी दुर्लक्ष केले जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी खाजगीत दिली आहे.
हेही वाचा : पालघर : वीज पुरावठा खंडित असल्याने वाडा आगरीतील बस सेवा ठप्प, एसटीचे वेळापत्रक बिघडले
वनविकास महामंडळ कासा अंतर्गत वेहेलपाडा, जव्हार, पिंपळशेत, चळनी, सोमटा या वनपरिक्षेत्राचे तसेच रोपाटिका विभागाची कार्यालये आहेत. कार्यालयाच्या इमारती जीर्ण झाल्या असून पावसाळ्यात इमारतीच्या छता मधून पाणी गळती होते. गळती होऊ नये यासाठी काही इमारतीवर प्लास्टिक टाकण्यात आले आहे. इमारतीच्या दरवाजे आणि खिडक्यांची देखील दुरवस्था झालेली आहे. या जीर्ण झालेल्या इमारतीमध्ये वनविभागाचे विविध प्रकारचे दस्तऐवज ठेवलेले आहेत. पावसाच्या दिवसात पाण्यामुळे हे दस्तऐवज भिजून नष्ट होऊ शकतात. जीर्ण इमारती कोसळल्यास जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जीर्ण झालेल्या इमारतीची दुरुस्ती करण्याची मागणी वनविभागाचे कर्मचारी करत आहेत.