पालघर : जिल्ह्यात समर्पित मालवाहू रेल्वे मार्ग तसेच पश्चिम रेल्वेचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून रेल्वे क्रॉसिंग बंद करून त्या ठिकाणी भुयारी मार्ग (अंडरपास) उभारण्याचे काम अनेक ठिकाणी पूर्ण झाले आहे. किरकोळ पावसात देखील अशा भुयारी मार्गांमध्ये पाणी साचत असल्याने अशा योजनेचे प्रयोजन फसल्याचे दिसून आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेल्वे मार्गावरील गाड्यांना गती मिळावी तसेच आगामी काळात होऊच पाहणाऱ्या समर्पित मालवाहू रेल्वे मार्ग व पश्चिम रेल्वेचे चौपदरीकरण या प्रकल्पांमधून धावणाऱ्या गाड्यांना अडथळा राहू नये या दृष्टिकोनातून विरार ते घोलवड दरम्यान व पुढे असणाऱ्या वेगवेगळ्या रेल्वे फाटक (लेवल क्रॉसिंग) बंद करून त्या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यास जागा अथवा तांत्रिक अडचणी येत होत्या अशा ठिकाणी भुयारी मार्ग (अंडरपास) उभारण्यात आले.

हेही वाचा : बोईसर : बिबट्याच्या हल्ल्यात शाळकरी मुलगा गंभीर जखमी

केळवे रोड- सफाळा, उमरोळी- बोईसर, वाणगाव – डहाणू, डहाणू- बोर्डी दरम्यान असे मार्ग उभारण्याचे काम हाती घेण्यात आले असून त्यापैकी बहुतांश ठिकाणी ही कामे पूर्ण झाली आहेत. २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसात यापैकी बहुतांश भुयारी मार्गांच्या ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता. अवघ्या २५ ते ३५ मिलीमीटर पावसामुळे भुयारी मार्गाची अशी अवस्था होत असल्याने या भुयारी मार्गाचा आराखडा चुकीचा ठरल्याचे दिसून आले आहे.

पालघर जिल्ह्यात २४०० ते २६०० मिलिमीटर पावसाची नोंद होत असते. अशा परिस्थितीत मातीमधून झिरपणारे पाणी व पावसाच्या पाण्यासोबत येणारी माती यामुळे हे मार्ग निसरडे व अपघात प्रवण होत असल्याचे यापूर्वी दिसून आले आहे. शिवाय भुयारी मार्गांमध्ये पाणी साचल्याने अनेक ठिकाणी पूर्व व पश्चिम भागाचा संपर्क तुटत असल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा : पालघर : अमृत सरोवर योजनेअंतर्गत जिल्ह्यात ७९ तलावांच्या खोलीत वाढ व सुशोभीकरण

बोईसर वंजारवाडी येथे अंडरपासला विरोध

बोईसर रेल्वे स्थानकाच्या उत्तरेला उड्डाणपूल उभारण्यासाठी जागेच्या उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाल्याने त्या ठिकाणी अंडरपास करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. या प्रस्तावाला स्थानिकांनी कडाडून विरोध केला असून बोईसर पूर्व पश्चिम जोडण्यासाठी उड्डाणपूल उभारण्याची मागणी रेटून धरली आहे.