विजय राऊत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कासा : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ४ डिसेंबर पासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे अंगणवाडी मध्ये जाणारे विद्यार्थी आणि स्तनदा मातांना पोषण आहारापासून वंचित राहावे लागत आहे. अंगणवाड्या बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांची हिरमोड होत असून त्यांच्या पोषण आहारावर याचा मोठा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.

अंगणवाडी सेविकांना मिळणारे तुटपुंजे मानधन, निवृत्ती वेतन, ग्रॅच्युइटी देणे आदी मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका, कर्मचारी यांनी बेमुदत संप पुकारला आहे. पालघर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका वर्षानुवर्षे तुटपुंज्या मानधनावर कर्तव्य बजावत आहेत. मात्र त्यांना वेळेवर मानधन मिळत नसून पोषण आहारासाठी मिळणारे अनुदान वेळेवर मिळत नसल्यामुळे आहार स्वखर्चातून खरेदी करून ४ ते ५ महिन्यांपर्यंत अनुदानाची वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सात हजार अंगणवाडी सेविका संपामध्ये सहभागी झाल्या असून यामुळे अंगणवाडी केंद्र सध्या बंद असल्यामुळे लाभार्थ्यांना शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.

जिल्ह्यातील अनेक अंगणवाडी केंद्रांना स्वतःची जागा उपलब्ध नसून बऱ्याचश्या अंगणवाडी केंद्रांची दुरवस्था झाल्यामुळे अनेक अंगणवाडी केंद्र घरांमध्ये, घरांच्या ओट्यावर आणि गावातील समाज मंदिरात भरत असल्याचे निदर्शनास आले आहे. अश्या अंगणवाडी केंद्रांना हक्काची जागा उपलब्ध करून देण्याची मागणी अंगणवाडी सेविकांकडून करण्यात येत आहे.

पालघर जिल्ह्याची कुपोषित जिल्हा म्हणून ओळख आहे. जिल्ह्यातील विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा या तालुक्यांत कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे. या भागातील लाभार्थ्यांना सकस पोषण आहार वेळेवर न मिळाल्यास कुपोषणाचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. शिवाय या भागात बेरोजगारी आणि गरिबीचे प्रमाण अधिक असल्यामुळे सकस आहार खरेदी करण्याची क्षमता नसल्यामुळे बरीचशी कुटुंब शासनाकडून मिळणाऱ्या आहारावर अवलंबून असून सध्या अंगणवाडी केंद्र बंद असल्यामुळे लाभार्थी सकस अहरपसून वंचित राहत आहेत.

पोषण आहार वाटप लाभार्थी

सात महिने ते तीन वर्ष – ६८०३४
तीन वर्ष ते सहा वर्ष – ६३५१३
अंगणवाडी – २२३०
मिनी अंगणवाडी – ५६९

अंगणवाडी सेविकांना केंद्र सुरू करण्याची सूचना आमच्या स्तरावरून देण्यात आली आहे. मात्र त्यांच्याकडून मागण्या पूर्ण होईपर्यंत केंद्र सुरू करण्यास नकार देण्यात येत आहे. आमच्या स्तरावरून विविध संस्थांकडे सकस आहार व पोषण आहार शिजवून देण्याची मागणी केली असता त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही. अंगणवाडी सेविकांच्या मागण्या पूर्ण करण्याचे अधिकार आमच्याकडे असल्यामुळे वरिष्ठ स्तरावरून याविषयी योग्य तो निर्णय घेण्यात येईल. – प्रवीण भावसार, जिल्हा क्र्याक्रम अधिकारी तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In palghar district the anganwadi center is closed the beneficiaries are away from nutrition asj