पालघर : पालघर शहरात एका आठ वर्षीय बालिकेवर लगतच्या ५४ वर्षीय किराणामाल दुकानदाराने विनयभंग केल्याचे प्रकार उघडकीस आले असून संबंधित व्यक्तीविरुद्ध बालकांचा लैंगिक अत्याचाराविरुद्ध कायदा (पॉक्सो) अंतर्गत पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुकानदार आपल्या पत्नीला व मुलांना गावी पाठवल्यानंतर किराणा माल घेण्यासाठी येणाऱ्या या बालिकेला गृह उपयोगी वस्तू विकत घेऊन जाण्यासाठी दुकानाच्या मधल्या बाजूला बोलवत असे. तसेच शरीराच्या लैंगिक भागांवर स्पर्श करण्याचा प्रयत्न त्यानी काही दिवसांपासून केला होता. या मुलीने याबाबतची माहिती आपल्या आईला सांगितल्या नंतर परिसरातील लोकांनी या व्यक्तीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. विशेष म्हणजे या दुकानदाराने यापूर्वी देखील असेच काही प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे.
हेही वाचा : तारापूरमध्ये अग्नीतांडव; तीन कारखान्यांना आगीची झळ
या संदर्भात पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही घटना घडल्या बाबत दुजोरा दिला. या बालिकेच्या लैंगिक अत्याचार विरोधी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत असल्याची माहिती त्यांनी दिली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.