वाडा : येत्या २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. या सोहळ्याला उपस्थित असलेल्या भक्तजनांना तांदळाच्या अक्षतांचे वाटप होणार आहे. या अक्षतांचा मान वाडा येथून उत्पादीत होणाऱ्या वाडा कोलमला मिळाला असून १० टन अक्षता वाडा येथून आयोध्येकडे रवानाही झाल्या आहेत.
अत्यंत चवदार असलेल्या, सेंद्रिय खतापासून उत्पादन केलेल्या वाडा कोलमला भारतातच नव्हे तर अनेक देशांतून मागणी वाढत आहे. अनेक खवय्यांच्या पसंतीस उतरलेल्या वाडा कोलमच्या अक्षता अयोध्येत लाखो भाविकांच्या हातात जाणार असल्याने वाडा कोलमचा हा मोठा सन्मान असल्याचे वाड्यातील वाडा कोलम उत्पादक शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.
हेही वाचा : पोलिसांचे वाहन उलटले, चार पोलीस जखमी
वाडा कोलमचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या एका कृषी उत्पादन संस्थेने दोन दिवसांपूर्वी १० टन वाडा कोलमचा तांदूळ अयोध्येकडे रवाना केला. दिलेल्या दानाबाबत कुठेही वाच्यता होऊ नये म्हणून त्यांनी आपल्या संस्थेचे नाव उघड न करण्याचे सांगितले. दरम्यान पालघर जिल्ह्यात राममय वातावरण निर्माण होऊ लागले आहे. दररोज ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.