कासा: मोखाड्यात सध्या एका माकडाने उच्छाद मांडला असून आता पर्यत १४ नागरिकांना या माकडाने चावा घेऊन जखमी केले आहे. माकडाने असा खुलेआम उच्छाद मांडला असला तरी गेल्या १० ते १२ दिवसांपासून वनविभागाला कळविल्यानंतरही यावर काहीच उपाय न शोधल्याने लोकांमध्ये माकडाची दहशत निर्माण झाली आहे. वनविभाग या माकडाच्या उच्छादाकडे दुर्लक्ष देत असल्याने माकडाला देखील इजा होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या माकडाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत. अन्यथा आता पर्यंत जखमी झालेल्या नागरिकांचा उपचार वनविभागाने करावा अशी मागणी होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून पवारपाडा ते जव्हार फाटा दरम्यान एक मोठे माकड (लाल तोंडाचे) फिरत असून हे कदाचित जंगलातून रस्ता चुकल्याने भरकटले आहे. मात्र हे माकड बाकी माकडाप्रमाणे नसून थेट नागरिकांवर हल्ला करून चावत असल्याचे चित्र आहे. वनविभागाच्या वाहन चालकाला सुद्धा हे माकड चावल्याचे समोर आले असून याभागातील अनेक लहान मुले, तरुण यांना सुद्धा याने चावा घेतलेला आहे. यामुळे याभागात दहशत निर्माण झाली आहे. हे माकड जाणाऱ्या येणाऱ्यावर अचानकपणे हल्ला करून चावा घेत असल्याने नागरिक घाबरून गेले आहेत. वयस्कर नागरिक किंवा लहान मुलांवर जर याने हल्ला केला तर मोठी अनुचित घटना घडू शकते.
वनविभागाने पिंजरा आणून या माकडाला धरून जंगलात सोडणे आवश्यक झाले आहे. मात्र वनविभाग या बाबीला गंभीर घेत नसल्याचे दिसून येत असून गेल्या १० ते १२ दिवसांपासून हा प्रकार होत असताना काहीच पाऊले उचलली जात नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
अन्य कोणत्याही व्यक्तीला हे माकड चावले असल्यास त्यांनी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे. यावरती लस ही उपलब्ध आहे असे जिल्हा आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले
जव्हार येथून पिंजरा मागविण्यात आला असून माकड पकडण्यासाठी पथक सुद्धा तयार करण्यात आले आहे. लवकरच हे माकड वनविभाग पकडून नागरिकांना दिलासा देणार आहे. ज्या नागरिकांना माकडाने चावा घेतला असेल त्यांनी रेबीज प्रतिबंधक लस घ्यावी.
राजेंद्र निकम (अधिकारी, वनविभाग मोखाडा)