कासा : डहाणू-जव्हार राज्यमार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात मोठमोठे खड्डे आणि चिखलामुळे वाहनचालकांना येथून प्रवास करणे अवघड जात आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने खड्ड्यांची संख्या वाढली आहे. परिणामी, अपघातांची संख्यादेखील वाढत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे तत्काळ भरावेत, अशी मागणी करत आंदोलनाचा इशारा वाहनचालकांनी दिला आहे.

डहाणू येथून नाशिक, मुंबई, ठाणे, गुजरात या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. डहाणूत असणारी अदानी कंपनी, आशागड येथील युनिव्हर्सल कॅप्सूल कंपनी, डहाणू, वाणगाव येथील भाजी, चिकू, मासळीची मोठी बाजारपेठ यामुळेही येथे वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. त्याचप्रमाणे वाढवण येथे नवीन बंदर निर्माण प्रकल्प सुरू असून त्याच्या कामानिमित्त अनेक वाहनांची ये-जा सुरू असते.

हेही वाचा : डहाणू : जन्मदात्याकडून पोटाच्या मुलीवर अत्याचार

तसेच, नवीन रेल्वे रुळांची अनेक कामे सुरू असल्याने अवजड वाहनेही ये-जा करत असतात. त्यामुळे या रस्त्याची पुरती चाळण झाली आहे. दरम्यान, रस्त्याच्या दुरवस्थेबाबत डहाणू बांधकाम विभागाकडे अनेकदा तक्रारी करूनसुद्धा रस्त्याची डागडुजी होत नाही. मागे दोन-चार वेळा खड्डे तात्पुरते भरण्यात आले होते, पण पडलेल्या मोठ्या पावसाने पुन्हा पूर्ववत खड्डे निर्माण झाले आहेत. यामुळे अपघातांचेही प्रमाण वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

प्रशासनाने त्वरीत ठोस उपाययोजना करण्याचा मागणी वाहनचालकांनी केली आहे. तसेच वेळीच हे खड्डे भरले न गेल्यास आंदोलन करण्याची तयारी काही नागरिकांनी केल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान प्रशासनाने येथील खड्डे आणि चिखलाचे खापर अवजड वाहनांच्या वर्दळीवर आणि पावसावर फोडले असून लवकरच खड्डे भरले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा : मुंबई : १५ डबा लोकलच्या २०९ फेऱ्या, पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात आजपासून बदल

अवजड वाहतुकीचे कारण

रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क केला असता या मार्गावरून अवजड वाहतूक सुरू असल्याने रस्त्यावर खड्डे पडत आहेत. तसेच सतत पाऊस सुरू असल्याने खड्डे भरता येत नसल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा : पालघर: आदिवासी समाजाचा बुलंद आवाज काळूराम (काका) धोदडे यांचे निधन

…या भागांमध्ये सर्वाधिक खड्डे

गंजाड, रानशेत, वधना, चारोटी, कासा या भागात खड्ड्यांचे प्रमाण जास्त आहे. कासा खु. ते कासा बु. या दरम्यानच्या १२ किमीच्या रस्त्यावरही वरोती, वेती, तलवडा या भागांत मोठे खड्डे पडले आहेत. तर काही ठिकाणी रस्ता खचला आहे. कासा गायकवाड पाडा, नर्सरी, ठाणा बँक, बाजारपेठ येथे पावसाचे पाणी जाण्यास मार्ग नसल्याने पाणी साचून राहत असल्याने रस्ता नादुरुस्त होत आहे. पावसाचे पाणी वाहून नेणारे गटार दोन्ही बाजूंना व्यवस्थित नसल्याने रस्ता खड्डेमय होत आहे. यासाठी ग्रामपंचायतनेसुद्धा लक्ष दिले पाहिजे, असे अनेकांचे म्हणणे आहे.