बोईसर : पालघरमध्ये २५ एकर जागेवर लवकरच मध्यवर्ती कारागृह बांधण्यात येणार असून त्यासाठी ६३० कोटींचा निधी राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे. कैद्यांसाठी सर्वसुविधायुक्त अत्याधुनिक पद्धतीने बांधण्यात येणार्या या कारागृहाची क्षमता १५०० कैद्यांची राहणार असून, यामुळे ठाणे आणि तळोजा येथील मध्यवर्ती कारागृहांवर पडणारा अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
पालघर जिल्ह्यातील पाचशेहून अधिक कैदी ठाणे व तळोजा येथील कारागृहात ठेवण्यात आले आहेत. त्यांना सुनावणीसाठी न्यायालयात ने आण करण्यासाठी पोलिसांना अनुक्रमे १०० ते १२५ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. त्यासाठी पोलिसांचे अतिरिक्त मनुष्यबळ लागत असून कैद्यांना न्यायालयात आणण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने त्रासदायक ठरत आहे. मध्यवर्ती कारागृह उभारण्यासाठी पालघर जिल्हा निर्मितीपासून प्रयत्न सुरू असून त्या प्रयत्नाला यश आले आहे. त्यानुसार उमरोळी येथील जागा मध्यवर्ती कारागृहासाठी निश्चित करण्यात आली आहे. पालघर जवळील उमरोळी येथील शासनाच्या अख्यातरित असलेली सर्वे क्रमांक ३०८ मधील सुमारे २३० एकर जागेपैकी मध्यवर्ती कारागृहासाठी २५ एकर जागा निश्चित करण्यात येऊन ती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तुरुंग प्रशासनाकडे हस्तांतरीत करण्याची प्रक्रीया पूर्ण करण्यात आली आहे.
हेही वाचा : पालघरमध्ये राजकीय संभ्रम कायम, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उमेदवार भाजप पळविणार का?
या सुविधांचा असणार समावेश :
•जलदगती सूचना आणि कृतींसाठी उच्च-सुरक्षा सेल
•पुरुष, महिला आणि तृतीयपंथी कैद्यांसाठी स्वतंत्र कक्ष.
•सर्व आवश्यक सुविधांसह रुग्णालय.
•स्वयंपाकघर, गॅस, बँक आणि दैनंदिन स्वयंपाकासाठी धान्य ठेवण्यासाठी जागा.
•बहुउद्देशीय सभागृहाच्या जागेसह वृक्षारोपण आणि नवीन रोपांची निर्मिती
•मध्यवर्ती पाहणी मनोरा आणि वाचनालय
•चांगल्या पायाभूत सुविधांसह कर्मचारी निवासस्थाने
•अतिथिगृह जागा.