सचिन पाटील
देशातील अग्रगण्य असलेल्या तारापुर औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधा सुधारणांकडे शासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष होत आहे. परिसरातील हरीत पट्टा झपाट्याने नामशेष होत असून प्रदूषण, वाहतूक कोंडी, धुळीचे साम्राज्य, अस्वच्छता, बकालपणा वाढीस लागल्याने संपूर्ण परीसराबाबत प्रथमदर्शनीच नागरीकांमध्ये नकारात्मक भावना निर्माण होत आहे.
तारापूर-बोईसर ही देशातील एक प्रमुख औदयोगिक वसाहत असून या ठिकाणी पोलाद, अभियांत्रिकी, औषध निर्माण , रसायन आणि कापड क्षेत्रातील जवळपास बाराशे कारखाने सुरू आहेत. यामध्ये मोठे ८०, मध्यम ७० कारखाने तर १०५० लघु उद्योजक असून सुमारे दोन लाख कामगार काम करीत आहेत. औद्योगिक क्षेत्राच्या नजीक तारापूर अणूऊर्जा प्रकल्प आणि भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर सारखे अतीसंवेदनशील प्रकल्प कार्यरत आहेत. औद्योगिक क्षेत्रामुळे परिसरातील बोईसर, सरावली, खैरापाडा, बेटेगाव, मान, कोलवडे, कुंभवली, पाम, पास्थळ आणि सालवड सारख्या ग्रामपंचायत क्षेत्रात झपाट्याने नागरीकरण होत असून या संपूर्ण परिसराची एकूण लोकसंख्या जवळपास तीन लाखांच्या घरांत गेली आहे. मात्र सतत वाढत्या लोकसंख्येला आवश्यक पायाभूत सुविधा पुरविण्याकडे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. एमआयडीसीच्या अखत्यारीत येत असलेली रस्ते, पथदिवे, गटार, परीसर सुशोभीकरण, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, वाहनतळ सारख्या अत्यावश्यक पायाभूत सुविधांची काही कामे अजूनपर्यंत अपूर्ण असून जी कामे पूर्ण करण्यात आली आहेत त्यांची देखील नियमीत देखभाल दुरूस्ती होत नसून झालेल्या कामांचा दर्जा देखील अतिशय निकृष्ठ असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा… दापचारी तपासणी नाक्यावर वाहतूक कोंडी
रस्ते आणि गटारांची दुरवस्था
तारापूर औद्योगिक क्षेत्राला मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाशी जोडणारा १६ किमीचा चिल्हार फाटा ते बोईसर हा रस्ता त्याचप्रमाणे बोईसर ते नवापुर या प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम हे ठेकेदाराकडून अतिशय निकृष्ठ दर्जाचे करण्यात आले आहे. पावसामुळे या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून रस्त्याच्या वरचा डांबराचा थर निघून जाऊन लहान खडी बाहेर आल्याने रस्त्यांच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खैरापाडा रेल्वे उड्डाणपुलाच्या मधोमध जीवघेणे खड्डे पडले असून औद्योगिक वसाहतीच्या अंतर्गत भागातील सीमेंट कॉक्रीटचे रस्ते देखील देखभाल व दुरुस्तीअभावी उखडले आहेत. दोष दायित्व कालावधी शिल्लक असताना सुद्धा ठेकेदाराकडून रस्त्याची दुरूस्ती हाती घेण्यात आलेली नाही. रस्त्यासोबतच एमआयडीसीच्या अंतर्गत भागातून वाहणार्या नाल्यांची नियमित सफाई केली जात नसल्याने झाडे-झुडुपे वाढून तसेच गाळ आणि प्लॅस्टिक साचून त्याला गटारांचे स्वरूप आले आहे. नाले आणि गटारे तुंबून त्यातील सांडपाणी बाहेर येत असल्याने नागरीकांना असहय दुर्गंधींचा सामना करावा लागत आहे.
हेही वाचा… पालघर जिल्ह्यातील किनारा लगतच्या ३९ गावांना मिळणार भुयारी विद्युत वाहिनीद्वारे वीजपुरवठा
वारंवार बंद पडणारे हायमास्ट आणि पथदिवे
औद्योगिक क्षेत्राच्या प्रमुख व अंतर्गत रस्त्यांवरील पथदिवे आणि मुख्य चौंकातील प्रखर विद्युत क्षमतेचे हायमास्ट नियमीत देखभाल-दुरुस्तीअभावी वारंवार बंद पडत असून यामुळे वाहनचालक आणि पायी ये-जा करणारे कामगार यांना अंधारातून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
चौक आणि वाहतूक बेटांची बिकट अवस्था
तारापुर औद्योगिक क्षेत्रातील खैरापाडा रेल्वे उड्डाणपूलाजवळील बिरसा मुंडा चौक, मुकुट टॅंक पेट्रोल पंप चौक, मधुर हॉटेल चौक, टाकी नाका आणि कॅम्लिन नाका चौक यांची पार रया गेली आहे. काही वर्षापूर्वी नामवंत उद्योगांमार्फत या चौकांचे सुशोभीकरण करण्यात आले होते. मात्र योग्य समन्वयाअभावी या चौकांच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले असून याठिकाणी धुळीचे थर साचले असून लावण्यात आलेली शोभीवंत झाडे आणि हिरवळ देखील पाण्याअभावी सुकून गेली आहे.
हेही वाचा… डहाणू : आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची इस्रो दर्शन सहल
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि वाहनतळाची प्रतीक्षा
औद्योगिक क्षेत्र आणि लगतच्या आठ ग्रामपंचायतीमध्ये रोज निर्माण होणार्या कचर्याच्या विल्हेवाटीसाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने कचर्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जागेअभावी संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू करण्यास अडथळे येत आहेत. औद्योगिक वसाहतीमध्ये मालाची ने-आण करणार्या करणार्या अवजड वाहनांसाठी कायमस्वरूपी वाहनतळ उपलब्ध नसल्याने ही वाहने मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर बेकायदा पार्कींग करून ठेवली जात असल्याने वाहतूक कोंडी आणि अपघातांची संख्या वाढत आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीच्या कामांना सुरवात करण्यात आली आहे. इतर कामे देखीलपुढील प्राधान्याने पूर्ण करण्याचे नियोजन आहे. – एन.एस. नाईक, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, ठाणे-१